शहरासाठीच्या सुधारित पाणी योजनेच्या एकाच भागात फुटणाऱ्या पाईपबाबत “सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची रत्नागिरी भाजपने दखल घेतली. त्याचा जाब त्यांनी आज मुख्याधिकाऱ्यांना विचारला. पाणीयोजना अजून पालिकेकडे वर्ग झालेली नाही, यामध्ये काही त्रुटी आहेत. या सर्वांची पूर्तता आणि परिपूर्ण योजना झाल्यानंतर ती वर्ग करून घेतली जाईल. पाईपलाईन वारंवार का फुटते याबाबत लवकरच आम्ही पाणी ऑडिट करू, असे पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले. पाणीयोजनेची पाईप फुटण्याचे दृष्टचक्र सुरूच, या मथळ्यावर “सकाळ”ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची रत्नागिरी भाजपने दखल घेतली. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके, खेडेकर, महिला पदाधिकारी आदींनी मुख्याधिकारी गारवे यांची भेट घेतली. शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सुमारे ६३ कोटी रुपये खर्च करून सुधारित पाणीयोजना राबवण्यात आली. सुरुवातीपासूनच ही योजना वादाच्या भोवऱ्यात आहे.
ठेकेदाराबाबत अनेक तक्रारी होत्या तरी हे काम अन्वी कंपनीला देण्यात आले. फेरमूल्यांकनामध्ये ठेकेदाराला १५.१९ टक्के म्हणजे ८ कोटी दरवाढ देण्यात आली. म्हणजे ५४ कोटींची ही योजना ६३ कोटींवर गेली. शहरातील ११ हजार नळधारकांना मुबलक पाणी मिळावे या उद्देशाने योजनेचे चांगले काम व्हावे, यासाठी प्रयत्न होता; परंतु अजूनही योजनेबाबत तक्रारी आहेत. शहरातील जिल्हा परिषद येथील उतारापासून अगदी जयस्तंभापर्यंत टाकण्यात आलेली पाईप दर्जाहीन असल्याचा आरोप भाजपवाल्यांनी केला. ही योजना पालिकेने ताब्यात घेतली आहे का, असे राजेश सावंतनी विचारता मुख्याधिकारी गारवे म्हणाले, ‘पालिकेने अजून सुधारित पाणी योजना ताब्यात घेतलेली नाही. शहरी भागात वारंवार पाईपलाईन का फुटते, याबाबत चौकशी करण्यात येईल. योजनेचे लवकरच पाणी ऑडिट करण्यात येणार आहे. त्यामध्ये नेमकी समस्या काय ते पुढे येईल. तशा उपाययोजना करण्यात येईल.
म्हणून फुटते वारंवार पाईपलाईन – सुधारित पाणीयोजनेची पाईपलाईन सुमारे १०४ किमीची होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कन्सल्टंट कंपनीने त्याचा आराखडा तयार केला. या किमीप्रमाणे पाईपलाईचा व्यास (रूंदी) ठरवली होती; परंतु आयत्यावेळी पाईपलाईनची सुमारे १५४ किमीएवढी लांबी वाढली. व्यास आणि क्षमता तेवढीच राहिली. लांबीप्रमाणे पाईपचा व्यास न वाढल्याने शहरात पाणी सोडल्यानंतर वारंवार पाईपलाईन फुटत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.