तालुक्यातील शृंगारतळी, वेळंब फाट्याजवळील नाल्यात सांडपाणी सोडल्याने नाल्यातील पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, कूपनिलका दूषित झाल्या आहेत. गेली दोन वर्षे हे सहन करणाऱ्या ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा इशारा दिला. प्रशासन सक्रिय होत ३८ संस्थांना नोटिसा पाठवल्या आहेत. यामध्ये शृंगारतळीतील व्यावसायिक, हॉटेल चालक, निवासी संकुले यांचा समावेश आहे. नदीपात्रात सोडलेले सांडपाणी तातडीने पूर्णतः थांबवावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. शृंगारतळी गावात हॉटेल व्यावसायिक, निवासी संकुले यांची संख्या वाढत आहे; मात्र या वाढत्या बांधकामांनंतर आवश्यक असलेल्या व्यवस्था सुनियोजितपणे उभ्या राहिल्या नाहीत. शृंगारतळी बाजारपेठेच्या दोन्ही बाजूने दोन नाले आहेत. या नाल्यांमध्येच सर्व सांडपाणी सोडले जात असल्याने दोन्ही नाले दूषित झाले आहेत. त्यापैकी वेळंब फाट्याजवळील नाल्यातील दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या विहिरी, बोअरवेल दूषित झाले.
हे पाणी पिण्यासच नव्हे, तर आंघोळीसाठी किंवा अन्य वापरासाठीदेखील वापरणे धोकादायक असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला. याबाबत ग्रामस्थांनी दोन वर्षांत अनेक तक्रारी केल्या; परंतु त्यांना दाद मिळत नव्हती. अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांनी सांडपाण्याची गटारे बुजवून टाकण्याची व नाल्यातच आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी तातडीने पाहणी केली. ग्रामपंचायतीने नाल्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे फोटो, व्हिडिओ आदी गोष्टींचे चित्रीकरण केले. त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायतीने ३८ जणांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत. दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतची एक सभाही पंचायत समितीमध्ये आयोजित केली आहे.