शहरात पुन्हा मचूळ व खारट पाणी मिळण्याचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक टँकरच्या पाण्याला अधिक पसंती देत आहेत. यातूनच दिवसाला २ टँकरच्या माध्यमातून १० फेऱ्या मारून ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तसेच विहिरींची साफसफाईही वेगाने केली जात असून आतापर्यंत ३० विहिरींची स्वच्छता केली आहे. लवकरच काही विहिरींवर पंप व टाक्यांची व्यवस्था केली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोवळकोट येथील जॅकवेल समस्यांच्या गर्तेत अडकली आहे. अनेकदा वाशिष्ठी नदी कोरडी पडत असल्याने जॅकवेलकडे पाणीच येत नाही.
काहीवेळा येणारे खाडीचे पाणी खारट व मचूळ असते. त्यामुळे गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप, मुरादपूर, उक्ताड, अर्धी बाजारपेठ या भागाला खारट, मचूळ व गढूळ पाणी येते. त्यामळे नागरिकांमधून ओरड सुरू आहे. यामुळे काही भागांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरीची स्वच्छता केली जात आहे. मध्यंतरी चांगले पाणी येत होते; मात्र आता पुन्हा मचूळ व खारट पाणी येत असून पाण्यात किडेही दिसत आहेत. त्यामुळे नागरिक टँकरच्या पाण्याला अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे सध्या ५ हजार लिटरचे २ टँकर दररोज १० फेऱ्या मारून नागरिकांची तहान भागवत आहेत.
सकाळी ६ वाजल्यापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जातो. रात्री ८ वाजता हे काम थांबवले जाते. हे पाणी खेडर्डी येथील जॅकवेलमधून येणारे असल्याने ते चांगले आहे. दुसरीकडे नगरपालिकेच्या तसेच ज्या व्यक्ती आपल्या खासगी विहिरी सार्वजनिक वापरासाठी देतात, अशा विहिरींची साफसफाई वेगाने सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत नगरपालिका व खासगी अशा मिळून ३० विहिरींची साफसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच आवश्यक त्या ठिकाणी पंप बसवून त्यातून तेथेच बसवल्या जाणाऱ्या टाक्यांमध्ये पाणी भरून ते नागरिकांना भरण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच नगरपालिका आपल्या खेर्डी माळेवाडी येथील जॅकवेलमधून बाधित भागाला पाणीपुरवठा करण्याचा विचार करत आहे.