शहरात दर आठवड्याला भरणाऱ्या आठवडा बाजारासाठी घाटमाथ्यावरून येणारे व्यापारी वाहतुकीच्या नियमांसह नगरपालिकेने आखून दिलेले क्षेत्रही धाब्यावर बसवत आहेत. त्यामुळे आठवडा बाजाराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा नाहक त्रास राजापूर शहरवासियांबरोबर बाजारासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांनाही होत आहे. राजापूर शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार दिवसेंदिवस अस्ताव्यस्त होत चालला आहे. यावर राजापूर नगर पालिकेचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. आठवडा बाजारासाठी परजिल्ह्यातून येणारे व्यापारी वाटेल तसे आणि वाटेल तिथे आपली दुकाने थाटत असल्याने शहरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
काही व्यापारी तर नागरिकांच्या घराच्या दारासमोर रस्त्यावर आपली दुकाने थाटत असल्याने नागरिकांनी घरात जावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी बंदरधवका परिसरापुरता मर्यादित असणारा आठवडा बाजार आता वैशंपायन पुला अगोदरपासून अगदी नवजीवन हायस्कूलपर्यंत पसरल्याने आता आठवडा बाजाराला बकाल स्वरूप आले आहे. आठवडा बाजारासाठी घाटमाथ्यावरून येणारे व्यापारी चक्क ट्रक वा अन्य वाहने रस्त्यात उभे करून मालाची विक्री करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचाही प्रश्न जटिल बनला आहे. शहरात आधीच पार्किंगची पुरेशी जागा नसताना हे आठवडा बाजारातील व्यापारी वाहने अस्ताव्यस्त लावतात. त्यामुळे चालायलाही त्रास होतो.