मार्च २०२० पासून कोरोना महामारीचा उद्रेक झाल्याने शासनाने सगळीकडे लॉकडाऊन जाहीर केले. त्यामध्ये सर्वच गोष्टी ठप्प झाल्या. अगदी सर्व उद्योग व्यवसाय, धार्मिक स्थळे, शिक्षण व्यवस्थेचा सर्व बोजवारा उडाला. शाळा बंद करण्यात आल्याने विद्यार्थी वर्गाचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. मग त्यावर पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबण्यात आली. परंतु, ही पद्धती फक्त मोठ्या शहरांसाठी उपयुक्त ठरली. कारण ज्या ठिकाणी स्मार्ट फोन आणि व्यवस्थित नेटवर्क असेल अशाच ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धती उपयुक्त ठरू शकते. यासाठी शिक्षकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वानाचं खूप तयारी करावी लागली.
शहरी भागाशी तुलना करता ग्रामीण भागामध्ये सुद्धा शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शिकायची इच्छा असून सुद्धा नेटवर्क प्रोब्लेम आणि स्मार्ट फोन उपलब्ध नसल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे आणि शेवटी प्रत्यक्ष समोर वर्गात विद्यार्थ्यांना शिकवणे आणि ऑनलाईन शिकवणे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत जाणवत आहे. विद्यार्थी सुद्धा ही शिक्षण पद्धती अवलंबून विशेष समाधानी दिसून येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी घसरताना दिसत असल्याचे अनेक शिक्षण तज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
काही विद्यार्थी वर्ग हे शहरी भागात राहत असूनसुद्धा, सर्वसामान्य अर्थार्जन करणाऱ्या पालक वर्गापैकी एक आहेत, काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने,काही झोपडपट्टीमध्ये राहत असणारे असल्याने त्यांना आर्थिक आणि भौतिक दृष्ट्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार करणे परवडणारे नसल्याने या विद्यार्थ्यांचे सुद्धा वर्ष शिक्षणाविना फुकट गेल्यातच जमा आहे. त्यामुळे खर्च असा प्रश्न पडतो कि ऑनलाईन शिक्षणपद्धती उपयुक्त कि ऑफलाईन!