केंद्रात असलेले दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटून नेत आहेत; पण आम्ही ही लूट होऊ देणार नाही. तुम्ही महाराष्ट्रातून जे वैभव लुटून नेले, जे प्रकल्प पळवले ते केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा आम्ही महाराष्ट्रात आणणार आहोत, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीतील सभेत दिली. तसे राणेंना दोन वेळा इथल्या जनतेने गाडलेय, त्यामुळे त्यांनी पोकळ चमक्या देऊ नयेत. राणेंनी केलेली पापे इथल्या जनतेच्या डोळ्यात अजूनही आहेत. त्यामुळे तिसऱ्या निवडणुकीतही राणेंना इथली जनता गाडणार आहे, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवलीत श्री. ठाकरे यांची सभा झाली. यात त्यांनी मोदी, शहा यांच्यावर जोरदार टीका केली. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते. श्री. ठाकरे म्हणाले, ‘मोदी आणि शहा यांनी संपूर्ण देश नासवून टाकला आहे. आता गद्दारांना सोबत घेऊन महाराष्ट्र लुटीचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे; पण महाराष्ट्राची लूट मी होऊ देणार नाही. तुम्ही महाराष्ट्रातून जे जे प्रकल्प पळवले, ते एकेक वेचून आम्ही परत आणणार आहोत.
नौदल दिनानिमित्त मोदी सिंधुदुर्गात आले होते, पण त्यांनी सिंधुदुर्गाला काहीच दिले नाही. उलट सिंधुदुर्गात मंजूर झालेला पाणबुडी प्रकल्प त्यांनी गुजरातला पळवला. मोदी सरकार कोकण उद्ध्वस्त करायला निघाले आहे. आधी जैतापूर अणुउर्जा प्रकल्प, नंतर रिफायनरी प्रकल्प आणून कोकणची वाट लावायला निघाले आहेत. त्यामुळे मी असेपर्यंत बारसू येथील रिफायनरी प्रकल्प होऊच देणार नाही. या प्रकल्पानंतर आता सिडकोच्या माध्यमातून संपूर्ण कोकण किनारपट्टीही परप्रांतीयांना देण्याचा घाट घातला जातोय. मात्र, त्यालाही आम्ही कडाडून विरोध करणार आहोत.’
ठाकरे यांनी सभेत राणेंच्या धमक्यांचाही समाचार घेतला. असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. धमक्या देणाऱ्यांना शिवसेनेने व जनतेने कधीच गाडून टाकलेय. राणेंनी २००५ मध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे अशा राजकीय बळींची मालिका सिंधुदुर्गात सुरू होती. वैभव नाईक यांनी राणेंचा पराभव करून ही मालिका संपवली, असे ते म्हणाले. पूर्वीच्या भाजपबद्दल मला आदर आहे; पण सध्या मोदी, शहा यांच्या भाजपचे हिंदुत्व हे बुरसटलेले आहे. सध्याच्या भाजपला मुले होत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांचे पक्ष फोडून त्याची मुले त्यांना कडेवर घेऊन नाचवावी लागत आहेत.
ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केले. त्याच विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपने तिकीटे दिली आहेत. गुंडाचा, बलात्कार करणाऱ्यांचा प्रचार मोदी, शहा करत आहेत. त्यामुळेच असल्या भेकड भाजप पक्षापासून आम्ही फारकत घेतली, असे त्यांनी स्पष्ट केले. या सभेत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर, अमित सामंत, विवेक ताम्हाणकर, अतुल रावराणे आदींनीही मोदी सरकारच्या टीका केली. धोरणांवर कडाडून
श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीग बरोबर सरकारमध्ये होते.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आम्हाला हिंदुत्वाचे आव्हान देत आहेत ; पण ज्या जनसंघाची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली होती. त्या श्यामाप्रसाद यांनी बंगालमध्ये मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन केले होते. काँग्रेसने सुरू केलेल्या चलेजाव चळवळीला विरोध करून ब्रिटिशांना साथ दिली होती. त्यामुळे बुरसटलेल्या हिंदुत्ववादी शहांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याऐवजी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर आधी चर्चा करावी, असे श्री. ठाकरे म्हणाले.