गुहागर-विजापूर महामार्गाचे काम अजूनही रखडलेले आहे. ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नाही. यामुळे मी सुद्धा निराश झालो आहे. संयमाचा अंत झाला आहे. या महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार आहे. आजपर्यंतच्या राजकीय जीवनात लेखी तक्रार कधीही केली नव्हती. या विषयाची गंभीर तक्रार करणार आहे, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. गुहागर मतदारसंघाच्या दौऱ्यावर सोमवारी (ता. ८) आलेल्या खासदार सुनील तटकरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार तटकरे म्हणाले, आजच्या आढावा बैठकीत जलजीवन मिशन, गुहागर शहरातील पाणी योजना, गुहागर-विजापूर महामार्गाच्या कामातील अडचणी, माणगाव अपघातातील १० जणांच्या दुर्दैवी मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळवून देणे, अन्य प्रलंबित प्रश्न याबाबत चौकशी केली. अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. काही अडचणींबाबत थेट वरिष्ठांशी चर्चा केली आहे. पुढील १५ दिवसांत यातील अनेक विषय मार्गी लागतील. महामार्गाच्या आठ गावातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जमीन मालकांना मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास प्रांतांना आज सांगितले आहे. कामाचा दर्जा आणि कामाची पूर्तता याबाबत या महामार्गाचे प्रमुख अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करण्याची विनंती केली.
आरजीपीपीएलची वीज महाग पडत असल्याने कोणीही वीज खरेदी करण्यास तयार नाही. तरीही हा प्रकल्प सुरू राहिला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. निरामय हॉस्पिटल देखील पुन्हा सुरू व्हावे यासाठी राज्य सरकारने लक्ष घातले पाहिजे यासाठी प्रयत्न करेन. पर्यटन मंत्री गिरीश महाजन सध्या कोकणातील पर्यटन धोरणाचा आढावा घेत आहेत. बीच रॉक पॉलिसीला सीआरझेडची फार मोठी अडचण येत नाही. त्यामुळे ही पॉलिसी लवकरात लवकर आणण्याबाबत त्यांना विनंती केली आहे. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, उपाध्यक्ष डॉ. अनिल जोशी, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आदी उपस्थित होते.