दापोली नगरपंचायतीत यापुढे शिवसेनेचाच नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही चपराक असून, कोकणातून ठाकरे शिवसेनेला उद्ध्वस्त केल्याशिवाय हा रामदास कदम गप्प बसणार नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली. दापोली येथील १४ नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये अन्वर रखांगे, विलास शिगवण, मेहबूब तळघरकर, अश्विनी लांजेकर, संतोष कळकुटके, खालिद रखांगे, फिरोज गिलगिले, रवींद्र क्षीरसागर, रिया सावंत, प्रीती शिर्के, शिवानी खानविलकर, कृपा घाग, आजीम चिपळूणकर, आरिफ मेमन आणि स्वीकृत नगरसेवक नादिर रखांगे आदींचा समावेश आहे. रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मला आणि माझ्या मुलाला योगेश कदम याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला; परंतु जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिले. २५ हजार मतांनी योगेश कदम यांना निवडून दिले. तसेच पक्षप्रमुखांनी देखील त्याची नोंद घेऊन ७ खाती देऊन राज्यमंत्रिपद दिले.
कोकणातील जनता पुन्हा शिवसेनेमध्ये येऊ लागली आहे. कोकणातल्या जनतेची बाळासाहेबांच्या शिवसेनेशी नाळ फार पूर्वीपासून जुळलेली आहे. कोकणचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे दापोली नगरपंचायतीच्या १४ नगरसेवकांनी आज योगेश कदम यांच्या कामाचा तडाखा बघून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. थोड्याच दिवसांत दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेचाच नगराध्यक्ष असेल. उद्धव ठाकरे आम्हाला राजकारणातून संपवायला निघाले आहेत, आता उद्धव ठाकरेंनाच कोकणातून उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही, अशी कडाडून टीका रामदास कदम यांनी केली.
‘उबाठा’त आता केवळ एकच नगरसेवक – ‘दापोली टायगर ऑपरेशन’ यशस्वी झाले असून, १४ जणांनी वेगळा गट स्थापन करून शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे दापोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. आता दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना १४, उबाठा १, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि भाजप १ नगरसेवक असे संख्याबळ झाले आहे.