26.2 C
Ratnagiri
Monday, January 5, 2026
HomeUncategorizedपंधरामाडचा बंधारा उधाणात तरणार की वाहणार?

पंधरामाडचा बंधारा उधाणात तरणार की वाहणार?

पावसाळ्यात उधाणावेळी समुद्रकिनारी मोठ्या लाटांचे तांडव सुरू असते. अनेकदा लाटांचे पाणी किनाऱ्यावरील लोकवस्तीत शिरते. सर्वांत धोकादायक असलेल्या शहराजवळील समुद्रकिनारी परिसरात पंधरामाड ते मिऱ्या असा प्रोयन पद्धतीचा संरक्षक बंधारा बांधला जात आहे. यातील पंधरामाड येथील काम तांत्रिक अडचणीमुळे रखडले. तात्पुरत्या स्वरूपात १०० मीटर किनाऱ्यांवर मोठे काळे दगड टाकून लाटांमुळे होणारी धूप थांबवण्याचा प्रयत्न पत्तन विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र, लाटांच्या तडाख्यात ही सुरक्षा किती टिकेल, यावर सर्वकाही अवलंबून आहे. मिऱ्या बंधाऱ्याचे अलावा भागाकडील काम वेगाने सुरू आहे; परंतु मुरूगवाडा भागाकडील शंभर मीटरचे काम झाल्यानंतर पंधरामाड भागातील बंधाऱ्याचे काम थांबले आहे.

या भागात मागील पाच ते सहा वर्षात मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप झाली आहे. ही धूप थांबविण्यासाठी प्रत्येक वर्षी या भागात दगडी टाकण्यात येतात; परंतु प्रचंड लाटांच्या माऱ्यात त्या वाहून जातात. त्यामुळे नगर पालिकेच्या रस्त्यासाठी असलेली जागा व स्थानिकांच्या जागाही समुद्राने गिळकृंत केल्या. सध्या बंधाऱ्याचे काम सुरू आहे. यापूर्वी टाकलेल्या दगडांवरूनच बंधाऱ्याचे काम पंधरामाड भागात सुरू केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती तसेच बंधारा बांधण्यातील तांत्रिक अडथळे दूर करण्यापूर्वी पतन विभागाने या पावसाळ्यात किनारी भागातील लोकवस्तीच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी १५ दिवसांपूर्वी माजी नगरसेवक राकेश नागवेकर, बंटी कीर व ग्रामस्थांनी पत्तन कार्यालयात अधिकाऱ्यांकडे केली होती.

सुरक्षेसाठी उपाययोजना न करताच प्रशासनाने स्थलांतराची नोटीस दिली तर आम्ही त्या स्वीकारणार नाही, असे नागवेकर यांनी सांगितले होते. या ठिकाणी तत्काळ सुरक्षेचे उपाय करू, असे पत्तनकडून आश्वासन दिले गेले. त्यानंतर आठवडाभरातच शंभर मीटरच्या परिसरात काळे मोठे दगड टाकून धूप थांबवण्यासाठी पावले उचलण्यात आली. दगडांमुळे सध्या लाटांचा मारा थांबेल, अशी आशा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे; मात्र पावसाळ्यात मिर्या किनारी अजस्त्र लाटा येतात. सध्या टाकलेले दगड लाटांचा मारा सहन करणार की, पुन्हा तेथील रस्त्याची धूप होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; परंतु पत्तन विभागाकडून केलेल्या उपायोजनेबाबत सध्या स्थानिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular