जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ३८ उमेदवार रिंगणात राहिलेले आहेत. सर्वच ठिकाणी अपक्षांची गर्दी असली तरीही खरी लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच रंगणार आहे. अर्ज मागे घेतलेल्यामध्ये प्रमुख पक्षांतील बंड करणाऱ्यांमध्ये रत्नागिरीतून ठाकरे शिवसेनेचे उदय बने, गुहागरमधून भाजपचे संतोष जैतापकर यांचा समावेश आहे. राजापूरमधून काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी माघार न घेतल्यामुळे बंड कायम आहे. दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर दापोली-खेड, गुहागर, चिपळूण-संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापूर-लांजा या पाच मतदारसंघांतील उमेदवार निश्चित झाले. त्यांना चिन्ह वाटप करण्यात आले. दापोली विधानसभा मतदारसंघात कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे नऊ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. त्यात शिंदे शिवसेनेकडून आमदार योगेश कदम, उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार संजय कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संतोष अबगुल, बहुजन समाज पार्टीकडून प्रवीण मर्चेंडे तर उर्वरित पाच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सर्वाधिक लक्ष लागलेल्या गुहागरमधून दोघांनी माघार घेतल्याने सातजण रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार भाजपचे संतोष जैतापकर यांनी घेतलेली माघार महायुतीचे शिंदे शिवसेनेकडून रिंगणात असलेले राजेश बेंडल यांना फायदेशीर ठरणार आहे.
याठिकाणी ठाकरे शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव उभे आहेत. राजापुरात एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतली असून आठ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात बंड करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे रिंगणातच राहिल्यामुळे महाविकास आघाडीकडून उभे असलेल्या उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यापुढे आव्हान राहिलेले आहे. त्यांना महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांचे आव्हान आहे. चिपळुणात दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रशांत बबन यादव पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) शेखर गोविंदराव निकम आहेत. हायहोल्टेज लढत ठरणाऱ्या रत्नागिरी मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आठ उमेदवार रिंगणात आहेत. बनेंच्या माघारीमुळे ठाकरे गटाचे बाळ माने यांचा मार्ग मोकळा झाला. त्याच्यापुढे शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आव्हान आहे.