दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या सणांचा आनंदोत्सव साजरा करत असतानाच मंगळवारी चिपळूणवासीयांनी सोने, चांदी, वाहने, मोबाईल, एसी, फ्रीज, टीव्हीसह विविध वस्तु, साहित्य, कपडे खरेदीचा आनंद लुटला. यामुळे चिपळूण बाजारपेठेत तेजी दिसून आली. या खरेदीतून करोडोंची उलाढाल झाली. नागरिकांनी ज्वेलर्समध्ये तुफान गर्दी केल्याने चिपळूण बाजारपेठेला ‘सुवर्ण झळाळी पाहायला मिळाली. दसरा विजयादशमीच्या मुहुर्तावर सोने-चांदीसह वाहने, विविध वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर व नवरात्रोत्सवानिमित्त चिपळूण बाजारपेठ सज्ज झाली होती. येथील व्यावसायिक, विक्रेत्यांनी नवरात्रोत्सवापूर्वीच आठ ते दहा दिवस अगोदर आपली दुकाने सजवली होती.
मंगळवारी दसरा सणाला सोने खरेदीने उच्चांक गाठला. शहरातील प्रत्येक सुवर्णपेढीमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. चांदी खरेदीलाही उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती काही व्यावसायिकांनी दिली. मंगळवारी येथील बाजारपेठेत २४ कॅरेट प्रतितोळे सोन्याचा दर ६१ हजार १०० रु. २२ कॅरेट प्रतितोळे सोन्याचा दर ५६ हजार ५०० रु. होता. चांदीची ७३ हजार रु. किलोने विक्री झाली. सोने-चांदीच्या दागिन्यांसह टीव्ही, फ्रीज, मोबाईल, कपाट, पलंग, नवीन कपड्यांसह विविध इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची झुंबड उडाली होती.
वाहतुकीचे नियोजन – खरेदीसाठी दिवसभर बाजारपेठ गर्दीने फुलून गेल्या होत्या. त्यामुळे शहर परिसरात झालेल्या रहदारीचे नियोजन पोलिस यंत्रणेकडून करण्यात आले होते.