राज्यभरात ग्रामीण एसटी वाहतुकीमध्ये महिला सन्मान योजनेंतर्गत ५० टक्के सवलत दिली जाते; परंतु रत्नागिरी व सांगली येथील शहरी बसवाहतुकीत ही सवलत नव्हती. महिलांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सवलत मिळण्याची मागणी केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षे वयोगटासाठी ५० टक्के आणि ७५ वर्षांपासून पुढे १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत रविवारपासून (ता. २३) लागू होणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक असल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही या महिलांनी विशेष आभार मानले आहेत.
मंत्री उदय सामंत, रत्नसिंधू योजनेचे कार्यकारी संचालक किरण सामंत तसेच युवा नेत्या अपूर्वा सामंत यांच्याकडे रत्नागिरीतील महिलांनी या सवलतीविषयी निवेदने दिली होती, चर्चा केली होती. यामध्ये माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, वैभवी खेडेकर, दीशा साळवी, कांचन नागवेकर, विद्या बोंबले, अपर्णा बोरकर तसेच फैय्याज मुकादम आणि गजानन पाटील यांनी देखील सवलतीविषयी मागणी करून पाठपुरावा केला. मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता हा विषय सांगितला होता.
अखेर या मागणीला यश मिळाले व उद्यापासून सवलत लागू होणार आहे. रत्नागिरी शहरी बसवाहतुकीच्या ताफ्यात सध्या ३७ बसेस आहेत. दिवसभरात दीडशे फेऱ्या शहराजवळील सुमारे २० गावांमध्ये व पंघरा किलोमीटरच्या हद्दीत सुरू आहेत. सवलत जाहीर झाल्यामुळे शहरी वाहतुकीच्या फेऱ्यांतून प्रवासी वाढणार आहेत, तसेच यातून एसटीचे उत्पन्न वाढणार आहे. सवलत योजनेबद्दल महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.