गेल्या तीन वर्षांत २० हून अधिक बांगलादेशी येथे सापडले आहेत. त्यानंतर अद्यापही हा सिलसिला सुरूच आहे. शुक्रवारी तालुक्यातील उमरोली भराडीवाडी येथून आणखी एका बांगलादेशी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर दहशतवादविरोधी पथकाने कारवाई करून गुन्हाही दाखल केला आहे. भारतात त्याचे ४० वर्षे वास्तव्य असून, तो बांधकाम व्यवसायात काम करत आहे. महम्मद युनूस यामीन मुल्ला (वय ४३, सध्या रा. द्वारा सखाराम बाबू तांडकर, उमरोली, भराडीवाडी, ता. चिपळूण, मूळ रा. बुडियाली, नाराईल जिल्हा, गालिया बांगलादेश) असे दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
गुढेफाटा येथे देवळाजवळ अशोक चव्हाण (रामपूर तळेवाडी) यांचे बांधकाम सुरू असून, त्या ठिकाणी महंमद मुल्ला हा सखाराम बाबू तांडकर यांच्या माध्यमातून कामे करत होता. तसेच तो गेली ४० वर्षांहून अधिक काळ भारतात वास्तव्य करत आहे. त्यामुळे त्याला दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भारतात अवैधरीत्या प्रवेश करून वास्तव्य केल्या प्रकरणी त्याच्यावर पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० कलम ३ (ए) सह ६ (ए) व विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक समीर शामराव मोरे यांनी दिली आहे. यापूर्वी तालुक्यात सावर्डे, चिपळूण आणि खेर्डी येथे बांगलादेशी नागरिक वास्तव्याला असल्याचे आढळून आले होते. हे बांगलादेशी येथे प्रामुख्याने बांधकाम व्यवसाय कारागीर बनले आहेत.