बदलापूर येथे चिमुरडीवर अमानुष अत्याचाराचा निषेध आणि नराधमाला तात्काळ फाशी द्यावी या मागणीसाठी चिपळूण गोवळकोट, पेठम ाप येथील महिलांनी कँडलमार्च काढत थेट चिपळूण पोलीस ठाण्यावर धडक दिली. यामध्ये मुस्लिम समाजाच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बदलापूर येथील एका शाळेत २ लहान मुलींवर तेथील सफाई कामगाराने अमानूष अत्याचार केले. १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.
ही घटना उघडकीस येताच संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले. बदलापूरमध्ये प्रचंड संताप व्यक्त करत हजारो लोक थेट रस्त्यावर उतरले होते. तसेच नराधमाला फाशी द्या अशीच मागणी सातत्याने केली जात होती. साऱ्या महाराष्ट्रात घडल्या प्रकाराने चीड निर्माण झाली असून विविध म ार्गानी निषेध केला जात आहे.
गोवळकोटमध्ये कँडल मार्च – चिपळूणमध्ये देखील त्याचे पडसाद उमटले. शहरातील गोवळकोट, पेठमाप व गोवळकोट रोड या परिसरातील महिला शुक्रवारी दुपारी एकत्र आल्या. काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरुह यांच्या नेतृत्वाखाली महिला, तरुणी, आणि शालेय मुलींनी एकत्र येत गोवळकोट रोड येथून कँडल मार्च काढला. गोवळकोट रोड, बाजारपुल ते बाजारपेठ मार्गे हा कँडल मार्च चिंचनाका परिसरातील शिवाजी महाराज चौकात आला. येथे जोरदार घोषणाबाजी करत महिलांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
फाशी द्या फाशी… ‘वुई वॉन्ट जस्टिस…. न्याय द्या, न्याय द्या….. चिमुरडीला न्याय द्या, फाशी द्या,…. फाशी द्या,…. नराधमाला फाशी द्या., नको आम्हाला लाडकी बहीण योजना…. हवी आम्हाला बहीण सुरक्षा योजना…’ अशा घोषणा देत महिला थेट चिपळूण पोलीस ठाण्यावर धडकल्या. येथे पोलीस निरीक्षकांची भेट घेत त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.