मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी जे ठेकेदार आणले त्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. कारण, वर्षातच महामार्ग उखडू लागला आहे. कशेडी बोगद्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पहिल्या पावसातच या बोगद्याला गळती लागली आहे. भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे कशेडी बोगद्याच्या कामाची चौकशी करावी, अशी तक्रार माजी खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी दौऱ्यावर असताना माजी खासदार राऊत यांनी याबाबत प्रसारम ाध्यमांना माहिती दिली. राऊत म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मी खासदार होतो तेव्हा केंद्र आणि राज्य शासनाकडे याचा वारंवार पाठपुरावा करून काम केरून घेतले; परंतु जे ठेकेदार आणले गेले त्यांनी कामाचा दर्जा न ठेवल्याने वर्षभरात महामार्ग ठिकठिकाणी उखडला आहे. महामार्गातील कशेडी बोगदा २ किमीचा आहे परंतु या बोगद्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बोगदा धोकादायक बनला आहे.
याकडे मी सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. पहिल्या पावसात पाणी झिरपू लागली आहे. त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. याकडे मी सर्वांचे लक्ष वेधले आहे. ३ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे अशी माहिती विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली.