रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू आहेत. आधी कामे केली जातात, नंतर वर्कऑर्डर दिली जाते, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला. जयस्तंभ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये उपस्थित होते. कीर म्हणाले, की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बांधकामांचे विषय त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यासाठी शहरात पाच ठिकाणी सुरू असलेल्या कामांबाबत त्यांच्या सय्यद नामक अभियंत्याला घेऊन संबंधित बांधकामांची पाहणी केली. मात्र, पंचनाम्याची प्रत मागितल्यावर अधीक्षक अभियंता व संबंधित अभियंता सय्यद कार्यालयातून निघून गेले. तसेच पंचनाम्याची प्रत देण्यास टाळाटाळ केली असा आरोपही कीर यांनी केला. चुकीच्या पद्धतीने ठेकेदारांनी काम करू नये, असे आपले म्हणणे असल्याचेही कीर यांनी स्पष्ट केले तसेच याबाबत ठेकेदारांना विचारणा केल्यावर ते हतबल असल्याचे त्यांनी सांगितले.

अभियंते किंवा अधिकारीच सांगतात की आधी काम करा नंतर बिले देतो, असे ठेकेदारांनीच सांगितल्याचे कीर यांचे म्हणणे आहे. शासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना पहिले टेंडर झाले पाहिजे. त्यानंतर अॅग्रिमेंट व वर्कऑर्डर दिली जाते त्यानंतरच काम करू शकतो; पण बांधकाम विभागात पूर्णपणे त्या उलट परिस्थितीत काम केले जाते. अशाप्रकारे बांधकाम विभागात गैरप्रकार सुरू आहे, असाही आरोप कीर यांनी केला. ठेकेदारांचीही संघटना आहे. त्या संघटनेमार्फत कामे वाटप केली जातात. त्या वेळीच कोणी कोणते काम करावयाचे आहे हे ठरवण्यात येते. जिल्हा परिषदेमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेची सत्ता असल्याने आतापर्यंत तेथे काहीही ते करू शकत नाहीत, असेही कीर यांनी स्पष्ट केले. ही काम करण्याची पद्धत चुकीची असून त्याला आपला विरोध आहे. संघटनेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने काम होत असून शासकीय नियम, अटी छेद देण्याचे काम संघटनेकडून सुरू आहे. हे बांधकामला वेठीस धरण्याचे काम करीत असल्याचा आरोपही कीर यांनी केला.

ही आहेत ती कामे – शासकीय वसाहतीतील इमारत क्र. ५ आणि ८, जेलरोड येथील कंपाऊंड वॉल, जिल्हधिकारी बंगल्याची दुरुस्ती, जि. प. मुख्याधिकाऱ्यांच्या बंगल्याची दुरुस्ती, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीची दुरुस्ती या कामांचा यामध्ये समावेश असल्याचे कीर यांनी सांगितले.