रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत रत्नागिरी ते दख्खन या ५५ किलोमीटरच्या टप्प्यातील काँक्रिटीकरणाच्या कामाला वेगाने सुरवात झाली आहे. नियोजनबद्ध काम सुरू झाले असून माती टाकून काही ठिकाणी काँक्रिटचा पहिला थरही टाकण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या तुलनेत रत्नागिरी ते कोल्हापूर टप्प्याचे काम अधिक वेगाने होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सध्या सुरू असलेल्या रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. तीन महिन्यांपूर्वी पैजारवाडी ते चोकाक या टप्प्यातील कामाचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्यावेळी हा मार्ग वेगाने पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले होते. रत्नागिरी ते कोल्हापूर अशा १२५ किमीचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. त्यामधील रत्नागिरी ते दख्खन या ५५ किमीचे काम राजस्थानच्या रवी इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे. त्यापुढील टप्पा दख्खन ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते चोकाक असा आहे.

रत्नागिरी ते दख्खनसाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. सध्या या कामाला वेगाने सुरवात झाली असून दीड महिन्यात काही टप्प्यात कॉक्रिटचा पहिला थरही टाकण्यात आला आहे.नियोजनबद्ध काम सुरू असल्यामुळे ते वेळेत पूर्ण होईल असा विश्वास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे पालीपर्यंत काम सुरू आहे. त्यापुढे कोल्हापूर मार्गावरही झाडे तोडून साफसफाई केली गेली आहे. नाणीज, दाभोळेसह त्या मार्गावर साखारप्यापर्यंत माती टाकून कच्चा रस्ता तयार केला आहे. या रस्त्याबरोबरच ठिकठिकाणी मोऱ्या उभारल्या जात आहेत. आराखड्यानुसार २ पूल यामध्ये उभारले जातील. दाभोळ गावाच्या बाहेरुन चौपदरी रस्ता केला जाणार आहे. याच ठिकाणी दोन डोंगरांच्यामध्ये मोठा पूल बांधण्यात येणार आहे. देवळे येथे टोलनाका होणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामाला स्थानिकांकडून सहकार्य मिळत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

कुवारबाव येथे चौपदरीकरणात पूल – कुवारबाव येथील बाजारपेठेवर हजारो व्यावसायिकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. चौपदरीकरणामध्ये येथील व्यावसायिकांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे या परिसरात पूल उभारावा अशी मागणी केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याकडे करण्यात आली होती. ती मंजूरही झाली असून कुवारबाव येथे पाचशे मीटर लांबीचा पूर उभारण्यात येणार आहे. याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही दुजोरा मिळाला आहे.