यशवंत जाधव हे शिवसेनेचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि मुंबई मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे शिवसेनेला धक्का मानला जात आहे. आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाधवांवर होणाऱ्या कारवाईमुळे शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होऊ शकतो.
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मालमत्तांवर गेले काही दिवस आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. मात्र आता त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यामागे आता ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. ईडीच्या समन्समुळे जाधवांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यशवंत जाधव यांना फेमा कायद्यांतर्गत ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीकडून यशवंत जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि आयटीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. यात त्यांच्या बेनामी कंपनीचीही चौकशी करण्यात आली आहे. याबाबत आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
गेली अनेक दिवस आयकर विभागाकडून जाधवांची चौकशी सुरू आहे. यात त्यांच्या मालमत्तांची यादी वाढतच गेली आहे. ३५ वरून मालमत्तांचा आकडा ५३ वर गेला आहे. ज्वेलर्सकडून तब्बल ६ कोटींचे दागिने रोख पैसे देत विकत घेतल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या या मालमत्तेवर आयकर विभागाकडून टाच आली असून, त्यामध्ये त्यांचा वांद्रयातील ५ कोटींच्या फ्लॅटचा देखील समावेश आहे. २५ फेब्रुवारीला आयकर विभागाने माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या या तपासादरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आणण्यात आली आहे.