गणपतीच्या आगमनप्रसंगी चाललेल्या मिरवणुकीत लेसर शोच्या वापरामुळे तरुणाच्या डोळ्यांतून रक्तस्त्राव झाल्याची धक्कादायक घटना घडली. लेसर किरणे थेट डोळ्यावर पडल्याने रक्तस्त्राव झाला. यानंतर तरुणाला मिरज येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. किसन पवार (वय २८) असे त्या तरुणाचे नाव आहे. घरोघरी आणि गणेश मंडळांत शनिवारी बाप्पाचे आगमन झाले. वाजतगाजत, गजरात, डीजेच्या ढोल-ताशांच्या दणदणाटात गणरायाची मिरवणूक काढून तालुक्यात गणपती बाप्पा विराजमान झाले.
एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत साउंड सिस्टीमच्या जोडीला लेसर शो होता. त्याचे प्रमाण अधिक होते. गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या किसन पवार या तरुणाच्या डोळ्यांवर ही लेसर किरणे पडली. डोळ्यात बुब्बुळाला लेसर किरणांमुळे इजा झाल्याने रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डोळ्यांना त्रास जाणवू लागल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. नेत्ररोग असलेले आणि तरुणाईनी लेसर शो न पाहिलेले बरे, असा सल्ला डोळ्यांच्या डॉक्टरांनी दिला आहे.
लेसरचे धोके – डोळ्यांच्या बाह्य बाजूला सौम्य स्वरूपाची इजा होऊ शकते. त्यामध्ये डोळे लाल होणे, चरचरणे, पाणी येणे आदी लक्षणांचा समावेश आहे. डोळ्यांत मागच्या बाजूला असणाऱ्या पडद्याला रेटिना म्हटले जाते. त्यावरील नाजूक रक्त वाहिन्यांवर लेसर थेटपणे पडल्यास या रक्त वाहिन्या फुगतात आणि त्यातून रक्तस्त्राव होतो. मध्यबिंदूच्या आसपास जर रक्तस्त्राव झाला, तर दिसणे कमी होते.