26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeRatnagiriरत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात युवकाचा धुमाकूळ

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात युवकाचा धुमाकूळ

सायंकाळी उशीरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता असे पोलीसांकडून सांगण्यात आले.

समस्त रत्नागिरीकरांचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरात मंगळवारी दुपारी घडलेल्या प्रकाराने सारेच हादरले. सोमवारी रात्रभर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि नाकीनऊ आणणाऱ्या तरूणाने मंगळवारी भैरी मंदिरात प्रवेश केला. तेथे येवून त्याने २ तास भगवद्‌गीतेचे वाचन केले. त्यानंतर अचानक त्याच्या अंगात वारे संचारले आणि अक्षरक्षः त्या तरूणाने भैरी मंदिरात धुडगूस घातला. त्याला बाहेर काढायला गेलेल्या एका पुजाऱ्याच्या डोक्यात धुपारत मारली

तर दुसऱ्या पुजाराच्या डोक्यात घंटा मारून त्याला गंभीर जखमी केले आहे. या प्रकारामुळे १२ ‘वाड्यात खळबळ उडाली आहे. आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यात हे वृत्त हा हा म्हणता सर्वत्र व्हायरल झाले आणि अवघ्या रत्नागिरीत खळबळ उडाली. अनेकांनी देवळात धाव घेतली. शहरात चर्चाना पेव फुटले आहे.

काठीने मारहाण – ऐन दुपारी १२वा. च्या सुमारास १ युवक मंदिरात आला आणि त्यांने तेथे असलेल्या सर्वांना त्याच्याकडे असलेल्या काठीच्या सहाय्याने मारण्यास सुरुवात केल्याने भक्तमंडळी चक्रावली. नेमके काय घडते आहे हे सुरुवातील कुणाच्याच लक्षात आले नाही. त्यानंतर मात्र त्याला रोखण्याचे प्रयत्न सुरु झाले. ते यशस्वीही झाले. मात्र त्या युवकाने केलेल्या मारहाणीमुळे २ जण जखमी झाले आहेत.

इंजिनिअर तरूण – स्थानिकांनी याबाबत पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार रत्नागिरी शहराजवळील कर्ला परिसरात राहणारा हा तरूण असून त्याने रत्नागिरीत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. इंजिनिअर असलेला हा तरूण सोमवारी तर्रर्र होऊन घरी आला होता अशी चर्चा सुरु आहे. मात्र पोलीसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. सोमवारी रात्री घरात राडा करून त्यांने सर्वांनाच जेरीस आणले. त्याच्या त्रासाला कंटाळून घरच्यांनी पोलिसांना बोलावून घेतले होते. रात्रभर त्याने पोलिसांसह घरच्यांनादेखील हैराण करून सोडले होते.

पहाटेच्या सुमारास सोडले – सुरू असलेल्या चर्चेनुसार या तरूणाला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले होते. पहाटेच्या सुमारास त्याला शहर पोलिसांनी ताकीद देऊन सोडून दिले होते. ताकीद दिल्यानंतर तो सरळ घरी जाईल, असे पोलिसांना वाटले मात्र त्याने भलताच गोंधळ घातला.

थेट भैरी मंदिर गाठले – पेशाने इंजिनिअर असलेला हा तरूण थेट भैरी मंदिरात दाखल झाला. तो भैरी मंदिरात बसून होता असे तिथल्या पुजाऱ्याने सांगितले. एकदम शांत तो बसला होता. त्याच्या हातात एक पुस्तक होते, असे देखील त्यांनी सांगितले.

भगवद्गीता वाचली – सुरू असलेल्या चर्चेनुसार या तरूणाने भैरी मंदिरात बसून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ३ तास भगवद्‌गीता वाचली. भगवद्‌गीता वाचण्यात तो तल्लीन झाला होता. मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांनी त्याला भगवद्गीता वाचताना पाहिले होते. दुपारी ११.३० वाजेपर्यंत तो मंदिरात बसूनच होता.

अंगात संचारले – एखाद्या साधकाप्रमाणे भगवद्‌गीता वाचण्यात तल्लीन झालेला हा तरूण अचानक उभा राहिला आणि थेट गाभाऱ्याकडे धावत सुटला. त्याने क्षणात गाभाऱ्यात प्रवेश केला आणि गाभाऱ्यात मुर्तीपाशी पोहोचला. तेथे तो काय करेल याची शाश्वती नसल्याने त्याला गाभाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी काही जण पुढे गेले, असे चर्चीले जाते.

धुपारत डोक्यात मारली – हा प्रकार लक्षात आला त्यावेळीं या मंदिराचे पुजारी चंदू गुरव धावत गाभाऱ्याकडे गेले. त्यांनी त्या तरूणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र अंगात संचारलेल्या त्या तरूणाने तेथील धुपारत उचलून चंदू गुरव यांच्या डोक्यात मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना ८. टाके पडले आहेत अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी पत्रकारांना दिली.

घंटा डोक्यात घातली – चंदू गुरव यांच्या डोक्यात धुपारत घातल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा मुलगा समीर गुरव पुढे आला. यावेळी बेभान झालेल्या या तरूणाने समीर याच्या डोक्यात पाटावर असलेली घंटा उचलून मारली. यामध्ये समर देखील जखमी झाला असून त्याला ६ टाके पडल्याची माहिती पुढे आली आहे, अशी चर्चा सुरू आहे.

दोन नेत्यांना फटकावले – हा प्रकार सुरू असताना रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध व्यक्ती दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. यामध्ये दोन राजकीय पक्षांचे नेते होते. हे नेते त्या तरूणाला काबूत आणण्यासाठी पुढे आले. मात्र त्या तरूणाने या नेत्यांना देखील सोडले नाही. अक्षरशः रौद्र अवतार त्या तरूणाने घेतला होता अशी चर्चा सुरु आहे.

अखेर पकडले – तमाम रत्नागिरीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव भैरी मंदिरात धुमाकूळ घालणाऱ्या त्या तरूणाला अखेर जमावाने कसेबसे पकडले. इंजिनिअर असलेला हा तरूण अचानक बेकाबू कसा झाला याची चर्चादेखील आता सर्वत्र सुरू आहे.

मंदिरात पाहणी – दरम्यान रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक महेश तोरस्कर यांनी मंदिरात येवून पहाणी केली. या व्यक्तीची चौकशी सुरु होती. मात्र याबाबत पोलीसांशी संपर्क साधला असता याविषयी कोणतीही तक्रार पोलीस स्थानकात दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी उशीरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता असे पोलीसांकडून सांगण्यात आले. मात्र या घटनेची जोरदार चर्चा शहरात सुरु असून सोशल मिडियावर बातम्यांचे पेव फुटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular