कोकण आणि घाटमाथा यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाला विविध कारणांनी विशेष महत्त्व आहे. तालुक्याचा पूर्व भाग असलेला पाचल परिसर कुशीमध्ये घेणारा अणुस्कुरा घाट विविधतेने नटलेला सध्या निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघालेला असून येथील निसर्गसौंदयाचा आस्वाद घेण्यासाठी सध्या तो पर्यटकांना साद घालत आहे. उन्हाळ्यात रूक्ष वाटणारा अणुस्कुरा घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात खुलले आहे. घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा प्रकल्प आणि घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन वसाहतही पाहताना घाटाच्या पायथ्याशी स्वर्ग अवतरल्याचा भास होतो.
सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये असलेल्या अनेक दुर्मिळ वन्यजीव, प्राण्यांना पाहण्याचीही अनोखी संधी मिळते. अणुस्कुरा घाटाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा या ठिकाणी अभाव आहे. पर्यटकांना राहण्यासाठी चांगली लॉजिंग, हॉटेल्स, पर्यटकांना घाटाची माहिती देणारे गाईड, पर्यटकांना ये-जा करण्यासाठी गाड्यांची सुविधा यांची या ठिकाणी वानवा आहे. या साऱ्या सुविधा उपलब्ध झाल्यास अणुस्कुरा घाट पर्यटकांसाठी वेगळीच मेजवानी ठरणार आहे.