तालुक्यामध्ये गेले पंधरा दिवस सातत्याने वळवाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे वाढत्या तापमानामुळे खालावलेले नैसर्गिक जलस्रोत पुन्हा एकदा व्हावू लागले आहे. याचा फायदा शहरातील पाणीटंचाई कमी होण्याला झाला आहे; मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई मे अखेरीपर्यंत ‘जैसे थे’ आहे. तालुक्यातील नऊ गावांमधील अकरा वाड्यांमधील सुमारे नऊशेहून अधिक लोकांना टंचाईच्या झळा पोहचत असून या टंचाईग्रस्त वाड्यांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, तुळसवडे, ताम्हाणे आणि जवळेथर अशी तीन गावांतील वाड्यांमधील लोकांनीही पंधरा दिवसांपूर्वी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केलेली आहे; मात्र त्यांना अद्यापही पंचायत समितीकडून पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नियमित पाऊस सुरू न झाल्यास या गावे आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीमध्ये ओणी- पाचलफाटा, ओझर-धनगरवाडी, वडवली-बौद्धवाडी, शिवाजीनगर, वडदहसोळ-हळदीची खांदवाडी, दोनिवडे-धनगरवाडी, कोंड्येतर्फ सौंदळ – बौद्धवाडी, तळगाव-तांबटवाडी, नवानगर देवाचेगोठणे-पाटवाडी, प्रिंदावण-तळेखाजण अशा नऊ गावांतील अकरा वाड्यांमधील सुमारे नऊशेहून अधिक लोकांना तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वळवाच्या पावसामुळे सायबाच्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.