जिल्ह्यात पिंक आय आणि आय फ्ल्यू, अशी डोळ्यांची साथ पसरली आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या शंभरहून अधिक जणांवर उपचार करण्यात आल्याची नोंद झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना सांगितले. हा संसर्गजन्य आजार असल्याने सर्वांनीच दक्ष राहण्याची गरज आहे. ज्यांना डोळे आले आहेत त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यात आता कोरोना हद्दपार झाला असला तरी आता डोळे येणे या नव्या संसर्गजन्य रोगाने डोके वर काढले आहे.
शाळा, कॉलेजमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळ्याच्या साथीचा फैलाव होताना दिसत आहे. डोळे येणे आजार हा एक प्रकारचा डोळ्यांचा संसर्ग आहे. त्याला पिंक आय किंवा आय फ्ल्यू असेही म्हणतात. डोळे येणे हा आजार झाल्यानंतर डोळे लाल होतात तसेच त्यांना सूज येते. जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या तीन दिवासांमध्ये शंभर ते दीडशेच्या वर रुग्ण उपचारसाठी येऊन गेल्याची नोंद झाली आहे. या संसर्गजन्य रोगाला थोपवण्यासाठी स्वच्छता आणि इतरांशी संपर्क टाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.