रत्नागिरी शहर परिसरामध्ये तापसरीसह डेंगीच्या साथीचा फैलाव झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात नियमित तपासल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये १०० रुग्ण तापाचे आहेत. त्यातील ३ टक्के रुग्ण डेंगी बाधित आहेत. खासगी रुग्णालयातही डेंगीच्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. यामुळे पांढऱ्या पेशी झपाट्याने कमी होत असून, प्लेटलेस्ची मागणी वाढली आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा अजूनही गंभीर नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. यंदा जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली; परंतु पावसाची उघडझाप सुरूच आहे, कधी पाऊस, तर कधी कडक उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे.
शहरातील उघडी गटारे, निचरा न होणारे सांडपाणी, काही ठिकाणी साचलेला कचरा, टायरमध्ये साचलेले पाणी, यामुळे जिल्ह्यासह शहरात आरोग्याची गंभीर परिस्थिती आहे. यामुळे तापाचे रुग्ण, डेंगीचे रुग्ण वाढले आहेत. प्रतिकूल असलेला एडिस इजिप्त डासाची वाढ झालेली आहे. रत्नागिरी शहरात डेंगी बाधित मोठ्या संख्येने आहेत. शहरातील खासगी रुग्णालयातील बाधितांची संख्याही मोठी आहे. साळवी स्टॉप येथील एका खासगी रुग्णालयात तर ३० पेक्षा अधिक डेंगीचे बाधित सापडले आहेत. आकडा घेतला, तर ही संख्या मोठी होणार आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातअशा शहरातील अनेक रुग्णांचा दररोज शंभरहून अधिक तापाचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यातील सुमारे तीन ते चार रुग्ण डेंगी बाधित होतात. त्यातील गंभीर आजारी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पांढऱ्या पेशींची संख्या कमी होत असल्यामुळे. प्लेटलेटस्ची मागणी वाढली आहे. सिव्हिल व्यतिरिक्त खासगी रुग्णालयात उपचार घेणारे अधिक आहेत. त्यांची नोंदणीच होत नसल्यामुळे प्रत्यक्षात बाधित किती यांची प्रशासनालाही आकडेवारी सांगणे शक्य नाही. गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात डेंगीचे पाच ते सहा रुग्ण सापडले होते. त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले आहे.
शहरात साळवी स्टॉप, नाचणे, परटवणे, घुडेवठार, जयस्तंभ, राजिवडा, कोकणनगर या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. कचरा, उघडी गटारे यांच्यामुळे दुर्गंधी वाढत आहे. सध्या अभ्युदय नगर, मारुती मंदिर शिवाजी नगर आरोग्य मंदिर त्याचप्रमाणे सन्मित्र नगर मारुती मंदिर या परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. शहरातील अभ्युदयनगर येथे परिसरात अधिक रुग्ण आढळत आहेत. रत्नागिरी शहर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणवार डेंगी रुग्ण सापडत असतानाही प्रशासनाकडून फलक लावण्याशिवाय कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पालिकेसह आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.