गेल्याच आठवड्यात दहावी परीक्षेच्या लागलेल्या निकालानंतर राज्यात अकरावी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला बुधवारी (ता. २१) प्रारंभ झाला; पण सकाळी ११ वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होण्याऐवजी पहिल्याच दिवशी शिक्षण मंडळाची वेबसाईट क्रॅश झाली आहे. संकेतस्थळ उघडताच अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होऊन अनेकांचे लॉगिन होत नाही. तर काही ठिकाणी भरलेली माहिती सेव्ह होत नसल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अकरावीच्या प्रवेशासाठी www.mahafyjcadmissions.in हे स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. मात्र, त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने शिक्षण विभागाकडून या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरळीत होईल, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ११वी प्रवेशासाठी एकूण २४ हजार ४८० जागा आहेत. त्यामध्ये आर्टस् शाखा ७ हजार ४४०, कॉमर्स शाखा ९ हजार ३०० आणि सायन्स शाखा ७ हजार ७४० जागांचा समावेश आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थीवर्गाची जोरदार लगबग सुरू झाली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यामुळे एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झाला. मात्र, बुधवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासमोर अडचण निर्माण झाली. यावर शिक्षण संचालनालयाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांना आजपासून कॉलेज पसंतीक्रम नोंदवून ऑनलाईन अर्ज भरता येणार होता. मात्र, संकेतस्थळ वारंवार डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांचे लॉगिन होत नव्हते. भरलेली माहिती सेव्ह होत नव्हती. त्यामुळे या प्रवेशासाठी गेलेल्या विद्यार्थी, पालकांवर माघारी परतण्याची वेळ आली. ही समस्या केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नव्हती. तर महाविद्यालयातील नोंदणीसाठी जबाबदार कर्मचाऱ्यांनाही तांत्रिक अडथळ्यांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार पालकांसह विद्यार्थी करत आहेत.
अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया – २१ ते २८ मे दरम्यान प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम ३० मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. ३० मे ते १ जूनदरम्यान हरकती व दुरुस्ती प्रक्रिया. ३ जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. ५ जूनला गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप. ६ जूनला विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर, ६ ते १२ जूनपर्यंत विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतात. १४ जूनला दुसऱ्या फेरीसाठी जागा जाहीर होतील.