पावसाळा सुरू झाल्यानंतर रत्नागिरी शहरातील दाटीवाटीच्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तापाचे अनेक रुग्ण शासकीय ऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या उपस्थितीत जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक यांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. डेंगीच्या रुग्णांमध्ये दापोली १, गुहागर ६, लांजा ५, राजापूर ११, संगमेश्वर ५, रत्नागिरी शहर ३१, मालगुंड ४, कोतवडे ७, पावस १६, चांदेराई २१, तर हातखंब्यातील १८ जणांचा समावेश आहे.
डेंगीच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा, अंगणवाडी सेविका यांची संयुक्त मोहीम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाणी साचलेल्या ठिकाणी धूर फवारणी, औषध फवारणी करण्यात येणार आहे. तापाचे रुग्ण असलेल्या परिसरातील घरांमध्ये जाऊन पाहणी केली जाईल. आठवड्यातून एकदा कंटेनर रिकामे करण्यात येणार आहेत. दरम्यान, डेंगीचे सर्वाधिक रुग्ण शहरी भागात असल्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात १५ प्रभाग आहेत. त्यांच्या मदतीला आशा सेविकांची नियुक्ती केली जाणार आहे.
ज्या भागात डेंगीचा रुग्ण आढळेल, तिथे आवश्यक त्या उपाय योजना तातडीने केल्या जातील. पालिकेने शहरात ठिकठिकाणी फलक लावून प्रचार व प्रसार केला आहे. मात्र, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अनेकठिकाणी साचणारे सांडपाणी, उघडी गटारे, साचलेला कचरा यामुळे डेंगीचा प्रादुर्भाव होणाऱ्या डासांची उत्पत्ती वेगाने होत असल्याचे पुढे आले आहे. पालिकेकडून मुख्य रस्त्यावरील स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. मात्र, दाटीवाटीच्या वस्तीकडील परिसरात अपेक्षित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे डेंगीसह तापाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. शहरासह आजुबाजूच्या ग्रामपंचायतींमध्येही रुग्ण वाढत असून त्याठिकाणी आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.