गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात कमालीची वाढ झाली असून, पारा सुमारे ३७ ते ३९ अंशापर्यंत पोहचला आहे. त्याचा आंबा-काजू पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून, फळं भाजून गळून जात आहेत. राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील गावांमध्ये फळगळतीचे प्रमाण अधिक आहे. तापमानवाढीने होणारी फळगळती रोखण्यासाठी झाडांना पाणी दिले जात असले तरीही कातळावरील बागांमध्ये पाण्याचे नियोजन करताना बागायतदारांना कसरत करावी लागत आहे. या वातावरणामुळे दहा ते पंधरा टक्के नुकसान बागायतदारांना सहन करावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. या वाढणाऱ्या उन्हाच्या झळा अधिकच असह्य झाल्या आहेत. त्याचा परिणाम आंबा, काजूपिकावर दिसू लागला आहे. ज्या बागांमधील झाडांना सुरुवातीला मोहोर येऊन फळधारणा झाली आहे त्या बागांमध्ये फळे परिपक्व होऊन काढणीच्या स्थितीमध्ये झाली आहेत. बागायतदारांनी फळतोडणी करण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे; मात्र त्यांच्या या तयारीवर प्रतिकूल हवामानाने पाणी पेरले आहे.
गेल्या काही दिवसांतील वाढत्या तापमानामध्ये अनेक बागांमधील झाडांवर अर्धवट भाजलेल्या स्थितीमध्ये तयार फळे दिसत आहेत. काही झाडाखाली फळगळती झाल्याचेही दिसत आहे. जसजसे तापमान वाढत आहे तसतसे फळगळती आणि फळ भाजण्याचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या तापमानाने होणारी फळगळती रोखण्यासाठी काही शेतकरी-बागायतदार झाडांना पाणी देण्यासारख्या उपाययोजना करताना दिसत आहेत. मात्र, दिवसागणिक वाढणारे तापमान आणि भविष्यात वाढते तापमान राहण्याची स्थिती पाहता किती दिवस झाडांना पाणी द्यायचे, असा प्रश्न या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
उत्पन्नावर परिणाम – हवामानातील बदलांमुळे नुकसानीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच विविध कारणांमुळे आंबा- काजू बागायतदारांच्या खर्च-उत्पन्नाचे गणित यावर्षी बिघडलेले असतानाच तापमानवाढीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे चटकेही बागायतदारांना सहन करावे लागणार आहेत.