गेले काही वर्षापासून राजापूर मधील डोंगर येथे शिमगोत्सवावरून वाद सुरू आहेत. त्याबाबत न्यायालयात अधिकाराबाबत दावा दाखल झालेला आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर तहसीलदारांनी यावर्षी डोंगर येथील शिमगोत्सव पार्टी क्र.२ म्हणजे गुरव गटाने रितीरिवाजाप्रमाणे साजरा करावा आणि पार्टी क्र.२ यांनी पार्टी क्र.१ शेलार गट व ग्रामस्थांना या सणामध्ये सामील करून घ्यावे, देवस्थानचे मुखवटे, दास्तान शिमगोत्सव साजरा करणे कामी पार्टी क्र.२ यांच्याकडे सुपूर्द करावेत, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष बैठकीत वाद निर्माण होऊन त्यातून हाणामारी होऊन राजापूर पोलिसांनी उभय गटातील सुमारे ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी प्रारंभी दिलेल्या आदेशाचे पालन उभय गटांकडून न झाल्याने वाद निर्माण झाल्याने आता नव्याने बंदी आदेश जारी करत शिमगोत्सव साजरा करण्यावर प्रतिबंध केला तर गावात १४४ कलमान्वये बंदी आदेश जारी केला आहे.
राजापूर तालुक्यातील डोंगर गावात शिमगोत्सव साजरा करण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला. वादानंतर गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये या करिता तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी १४४ कलमान्वये गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
१९ मार्च ते २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहेत. या आदेशान्वये डोंगर गावातील होळीचा मांड, श्री निनादेवी, डोंगरादेवी, ब्राम्हणदेव ही मंदिरे व त्या मंदिराच्या १०० मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पार्टी क्र. १ व त्यांचे हितसंबधित तसेच पार्टी क्र. २ व त्यांचे हितसंबधित यांना जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतच्या नोटिसा दोन्ही गटांना स्पष्ट बजावण्यात आल्या आहेत.
तहसीलदार जाधव यांनी पार्टी क्र.२ ला उत्सव साजरा करण्याची परवानगी देताना रितीरिवाज व प्रत्यक्ष कामकाज कशा पध्दतीने करावे याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले नसल्याने उभय गटात पालखी नेण्यावरून वाद निर्माण झाल्याचे शेलार गटाचे म्हणणे आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उभय गटातील संशयितांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची सध्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.