कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात कोत्रेवाडीवासीयांच्या मागणीनुसार पत्र देण्याचे नायब तहसीलदारांसमोर कबूल करणाऱ्या लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी आवश्यक ते पत्र न दिल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्याधिकारी यांनी आपला शब्द फिरवून ग्रामस्थांची दिशाभूल करणारे दिलेले पत्र ग्रामस्थांनी स्वीकारले नाही तर यापुढे यापेक्षा संघर्ष तीव्र करताना होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला. कोत्रेवाडी ग्रामस्थांनी लांजा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छडले होते. उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापू जाधव, ज्येष्ठ नेते महंमद रखांजी, दाजी गडगिरे, बाबा धावणे त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये, जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे आदींनी पाठिंबा दर्शवला होता.
सकाळपासूनच कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. दुपार सत्रात मुख्याधिकारी हर्षला राणे, नायब तहसीलदार अजय गोसावी, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांनी उपोषणकर्त्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची भेट घेतली. या वेळी मंगेश आंबेकर म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जागेचे भूसंपादन कसे केले? या प्रस्तावित प्रकल्पाकडे जाण्यासाठी अधिकृत रस्ता नसताना, जलस्त्रोत जवळ असताना आणि मंडळ अधिकारी यांनी असा प्रस्तावदेखील दिलेला असताना नगरपंचायतीकडून जबरदस्तीने हा प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
या वेळी मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी सांगितले की, सदर भूसंपादनासाठी फेरसर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. कोणत्या दिवशी त्या जागेचे फेरसर्वेक्षण करण्यात आले? त्या फेर सर्वेक्षण कमिटीमध्ये कोण कोण होते ? असे प्रश्न केले. त्याची सर्व कागदपत्रे आम्हाला द्या, अशी ग्रामस्थांनी मागणी केली असता मुख्याधिकारी यांनी मौन पाळले. मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर गेलो नसल्याचे कबूल केले. त्यावर तुम्ही हा प्रकल्प रद्द करतो, असे पत्र आम्हाला द्या. आम्ही आमचे उपोषण मागे घेतो, अशी भूमिका मांडली; मात्र प्रकल्प रद्द करण्याचा अधिकार मला नाही, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
यावर ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र तुम्ही वरिष्ठ स्तरावर पाठवा, अशी आमची मागणी आहे आणि तसेच पत्र आम्हाला द्या, अशी ग्रामस्थांनी मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली. त्यावर मुख्याधिकारी यांनी ग्रामस्थांच्या मागण्यानुसार पत्र देण्याचे कबूल केले; मात्र रात्री आठ वाजेपर्यंत मुख्याधिकारी उपोषणकर्त्यांकडे फिरकलेच नाहीत. आठ वाजता अधिकारी अविराज पाटील हे नायब तहसीलदार यांच्या समवेत दाखल झाले आणि त्यांनी जुलै महिन्यातील संदर्भ पत्र दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रां घेत आम्हाला दुपारी मुख्याधिकारी यांनी सांगितलेल्या आश्वासनाप्रमाणे पत्र द्या, अशी मागणी केली.