केंद्र शासनाच्या ‘एक देश, एक रेशनकार्ड’ योजनेंतर्गत जिल्ह्यात सर्व रेशनकार्डाची छाननी करण्यात आली. या वेळी ७४२ कार्ड दुबार आढळली. रत्नागिरी जिल्ह्यातील ३५७ तर अन्य जिल्ह्यांतील ३८५ कार्ड पुरवठा विभागाने रद्द केली आहेत. एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या रेशनकार्डवर असल्याचे अनेक प्रकार आजवर दिसून येत होते. परंतु, आता रेशन धान्य वितरण प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन झाली आहे. त्यामुळे एकच नाव दोन रेशनकार्डवर असेल तर ते लगेच दिसून येते. केंद्र शासनाने ‘एक देश, एक रेशनकार्ड’ ही योजना सुरू केली.
या योजनेंतर्गत आता देशात कुठलाही व्यक्ती कुठल्याही रेशन दुकानातून रेशन घेऊ शकतो. यासाठी रेशन वितरण ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे कोणत्या व्यक्तीच्या नावावर रेशन उचलले गेले हे लगेच दिसून येते. दुबार नावे असल्यास तिही दिसून येतात. जिल्ह्यात दुबार शिधापत्रिकांची छाननी केली. यात ३५७ रेशनकार्ड दुबार असल्याचे आढळल्याने ही रेशनकार्ड रद्द करण्यात आली.
घरामागे महिन्याला ७ हजार किलो शिधा वाचणार – जिल्हा पुरवठा विभागाच्या या कारवाईमुळे धान्याची मोठी बचत होणार आहे. जिल्ह्यातील ३५७ दुबार कार्ड रद्द झाली आहेत. या कार्डवर साधारणतः चार माणसे अवलंबून असल्याचे गृहित धरल्यास सुमारे ७ हजार किलो धान्य वाचणार आहे.
दृष्टिक्षेपात…. – 1)जिल्ह्यातील ४ लाख २१ हजार ५९४ कार्डधारक
2) श्वेत कार्डधारक ४४ हजार ५८३
3) अंत्योदय २८ हजार ५२२
4) प्राधान्य २ लाख ३७ हजार ४३९
5) १ लाख एपीएलधारक