गतवर्षी पोलिस दलाने फेब्रुवारी ते ऑक्टोबर या महिन्यात केलेल्या कारवाईत ७४ अमली पदार्थ विक्रेत्यांची झिंग उतरवली. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ७९ लाख ३५ हजार २१२ रुपयांचा १२८ किलो ८६९ ग्रॅम इतका अमली पदार्थांचा साठा जप्त केला. रेकॉर्डवरील गुन्हेगार व ज्यांचा अमली पदार्थ विक्रीत सहभाग आहे, अशा २५ जणांच्या तडिपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले. मात्र, या प्रस्तावात अद्याप निर्णय झालेला नाही. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थ विक्रीचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. अमली पदार्थांची आयात आणि राजरोस विक्री प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढली होते.
जिल्ह्यातून अमली पदार्थांची विक्री आणि सेवन यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी धडक मोहीम हाती घेतली. पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत फेब्रुवारी ते ऑक्टोबर (एप्रिल वगळून) या आठ महिन्यांत ३९ कारवाया केल्या. त्यामध्ये गांजाबाबत २७, ब्राऊन हेरॉइनच्या ११, अॅम्फेटामाइन व टर्की प्रत्येकी १, तर चरसच्या २ कारवायांचा समावेश आहे. या कारवायांमध्ये ६७ जणांकडे अमली पदार्थ सापडले असून, १६ जण सेवन करताना आढळले आहेत.
पोलिसांनी कारवाईत ३ लाख ४२ हजार ९८२ रुपयांचा गांजा जप्त केला तसेच १९ लाख ९५ हजार ९८० रुपयांचे ब्राऊन हेरॉइन, ३ कोटी ५५ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा चरस, ९ हजार ४५० रुपयांचा टर्की आणि ५५ हजारांचा अॅम्फेटामाइन जप्त केला आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण कारवायांमध्ये रत्नागिरी शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. जिल्ह्यात १० ठिकाणी तर रत्नागिरी शहर व ग्रामीण हद्दीत सर्वात जास्त २२ कारवायांचा समावेश आहे.