नैसर्गिक उताराने रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाला ७० वर्षे होऊन गेली तरीही दुरुस्ती झालेली नाही. या धरणाच्या दुरुस्तीचा २० कोटींचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी धूळखात पडला आहे. यंदा पावसाळ्यात पानवल धरण पूर्णतः भरले असले तरीही धरणाला ४० टक्के गळती आहे. पालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भविष्यात चार महिने शहराला पाणी देणारे हे धरण पावसानंतर दोन ते अडीच महिन्यातच रिकामे होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल धरण १९६५ ला बांधले आहे. शीळ, पानवल धरण व नाचणे तलाव या तीन जलस्त्रोतांतून रत्नागिरीला पाणीपुरवठा होतो.
पानवलचा पाणीसाठा फेब्रुवारीच्या अखेरीस संपुष्टात येतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असते. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची मोठी कसरत पालिका प्रशासनाला करावी लागते. सुधारित पाणीपुरवठा योजनेमुळे गळती कमी झाल्याने ताण कमी झाला आहे; परंतु शीळ धरणातील पाण्याच्या मर्यादित साठ्यामुळे पालिकेला पाणीपुरवठ्याची मोठी चिंता आहे. उन्हाळ्यात या वेळी पानवल धरणातून पाणी न मिळाल्याने शीळ धरणावर ताण पडला होता. त्यामुळे तीन महिने आधी पाणीकपातीचे नियोजन करण्यात आले. प्रथम दर सोमवारी नंतर आठवड्यातून दोनवेळा म्हणजे सोमवार, मंगळवार आणि त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला.
पालिकेच्या या निर्णयामुळे यंदा उन्हाळ्यात शहराची तहान भागली. शहरापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर हे पानवल धरण आहे. ते १९५२ मध्ये मंजूर झाले होते. १९६५ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. विजेसाठी एकही रुपया खर्च न करता नैसर्गिक उताराने शहराला पाणीपुरवठा होत आहे. या धरणातील पाणी नाचणे जलशुद्धीकरण केंद्रात येते. तिथे शुद्धीकरण करून ते शहरवासीयांना पुरवले जाते. पानवल धरणात ५१८ दलघमी पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. या पाण्याचा वापर शहरवासीयांना सहा महिने केला जातो. या धरणाची गेल्या ७० वर्षांमध्ये दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून साठवण क्षमताही कमी झाली आहे. या धरणातून ४० टक्के गळती होत असल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.