चिपळूण आगारातील एसटी बसेस निवडणुकीच्या कामासाठी देण्यात आल्यामुळे आज प्रवाशांचे हाल झाले. अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या. काही मार्गावरील फेऱ्या उशिराने सोडण्यात आल्या. चिपळूण आगारातून नियमित सुटणाऱ्या तब्बल ६३ फेऱ्या रद्द केल्या आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतदान केंद्रात मतपेटी पोहचवण्याची प्रक्रिया निवडणूक विभागातर्फे सुरू झाली आहे. कर्मचारी आणि मतपेटी मतदान केंद्रावर नेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ३१ बसेस निवडणूक कामासाठी कार्यरत आहेत.
मात्र बसेस निवडणूक कामासाठी लागल्याने रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील मतपेटी बसने मतदान केंद्रात नेण्यासाठी एसटी बसेस घेण्यात आल्या आहेत. चिपळूण आगारातील ६० कर्मचारी, तर ३१ बसेस मतपेटी मतदार केंद्रात नेण्यासाठी सेवेत दाखल आहेत. चिपळूण एसटी आगारातील बसेसची संख्या कमी झाली. त्यामुळे रोज वेळेत सुटणाऱ्या अनेक बसेस रद्द केल्या होत्या. सोमवारी अनेक बसेस रद्द केल्याने हे प्रवासी तिष्ठत होते.