घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर आहे. वारंवार आवाहन करूनही घरपट्टी थकवणाऱ्या ६४ जणांची मालमत्ता जप्ती पथकाने सील केली आहे; तर ४७ नळजोडण्या तोडल्या आहेत. घरपट्टी वसुलीचे पालिकेपुढे १४ कोटींचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ८ कोटी २० लाख म्हणजे ६० टक्के वसुली झाली आहे. रत्नागिरी पालिकेने घरपट्टी वसुलीवर जोर दिला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या दहा दिवसांमध्ये ४० टक्के घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पालिकेच्या वसुली पथकावर आहे. त्या अनुषंगाने शहरात आठ पथके वसुलीसाठी फिरत आहेत. घरपट्टी वसुलीसाठी पालिकेने शहरातील सुमारे तीस हजार मालमत्ता धारकांना नोटिसा दिल्या आहेत. घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपकावरून नेहमी घरपट्टी भरण्याबाबत आवाहन केले जात आहे. तरी अनेक मालमत्ताधारक याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे घरपट्टी वसुलीसाठी मालमत्ता विभागाची पथके आता अॅक्शन मोडवर आहे.
कर बुडवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पथकांद्वारे थकबाकीदार असलेल्या मालमत्ता सील केल्या जात आहेत. आतापर्यंत पालिकेने शहरातील ६४ मालमत्ता सील केल्या आहेत. तसेच ४७ थकबाकीदारांची नळजोडणी तोडली आहे. तसेच ४७ थकबाकीदारांची नळजोडणी तोडली आहे. पालिकेची ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार आहे. घरपट्टींचे एकूण उद्दिष्ट १४ कोटी आहे. त्यापैकी आतापर्यंत ८ कोटी २० लाख रुपये वसूल झाले आहेत. ६० टक्के ही वसुली झाली आहे. उर्वरित वसुलीसाठी पालिकेच्या वसुली पथकाची मोहीम कायम राहणार आहे. यामध्ये शासकीय थकबाकीदारांचाही समावेश आहे.
कारवाई सुरूच राहणार – घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्यात आले आहेत. ही कारवाई पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.