लांजा शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे अॅप हॅक करून यश कन्स्ट्रक्शन या ठेकेदारी फर्मच्या खात्यातून ९२ लाख ५० हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार घडला होता. चोरट्याने त्यापैकी ८० लाख विविध बँक खात्यात वर्ग केले होते. ही सर्व खाती गोठविण्यात जिल्हा पोलिस दलातील सायबर सेलला यश आले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम यश कन्स्ट्रक्शनच्या खात्यावर परत वर्ग केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी कुलकर्णी बोलत होते. एका राष्ट्रीयकृत बँकेच्या लांजा शाखेत ४ ऑक्टोबर २०२२ ला हा प्रकार घडला होता.
ही गोष्ट फर्मचे मालक सुधीर भिंगार्डे यांच्या लक्षात आला. त्यांनी ७ ऑक्टोबरला याबाबत पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानंतर लांजा पोलिस तपास यंत्रणेच्या याप्रकरणी झालेल्या ढिलाईमुळे हे प्रकरण जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आले होते. रत्नागिरी सायबर सेलने या गुन्ह्याचा तपास करताना संबधित राष्ट्रीयकृत बँक खात्यातून ज्या खात्यात पैसे वर्ग झाले होते. त्या खात्याचा शोध लावला. त्यानंतर त्या त्या बँकेला ती बँक खाती गोठविण्याची सुचना देण्यात आली.
त्यानुसार सुमारे ८० लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात सायबर सेलला यश आले आहे. मात्र संबधीत चोरट्यांचा शोध अध्याप लागलेला नाही. ज्या बँक खात्यात रक्कम गोठविण्यात आली आहे. ती रक्कम न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर यश कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे. त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.