ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्याचा फटका भातशेतीला बसला आहे. यावर्षी जिल्ह्यात जून ते ९ ऑक्टोबर या कालावधीत सरासरी ४२३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीपेक्षा ८६६ मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसामुळे यावर्षी भात उत्पादन चांगले येईल, अशी शक्यता आहे तसेच यंदा टंचाईची तीव्रता कमी जाणवेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मोसमी पावसाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरवात झाली; मात्र त्यानंतर चार ते पाच दिवस घेतलेल्या विश्रांतीने भात पेरण्यांवर परिणाम झाला. त्यामुळे भातशेतीचे वेळापत्रक आठ दिवसांनी पुढे गेले. पेरण्या केल्यानंतर लावणीसाठी आवश्यक रोपं रुजून येण्यास २१ दिवसांचा कालावधी लागतो.
पाऊस कमी असेल तर रोपांची वाढ होण्यासाठी कालावधी अधिक लागतो. यंदा तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. भातलावण्या सुरू करण्यासाठी जुलै महिन्याचा पहिला आठवडा लागला. शंभर टक्के लागवड पूर्ण करण्यासाठी २० जुलैपर्यंतचा कालावधी लागला होता. यंदा जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवर भात लागवड झाली आहे. जून महिन्यात शेवटच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे भातशेतीला पोषक स्थिती होती; परंतु ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कडकडीत ऊन पडल्यामुळे बळीराजा धास्तावला होता. याच कालावधीत करपा, निळे भुंगरे यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. सतर्क कृषी विभागाने तातडीने शेतकऱ्यांना औषध फवारणीचा सल्ला दिला. ज्या शेतकऱ्यांनी त्यानुसार औषध फवारणी केली, त्यांच्या शेतामधील रोगांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले होते.
पुढे सप्टेंबर महिन्यातही अनियमित पाऊस होता. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातून मोसमी पावसाने माघारी परतण्यास सुरवात केली आहे. ऐन भातकापणीत पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी भातं आडवी झाली होती. काही शेतकऱ्यांनी भिजलेले भात कापून, झोडणी करून ते सुकवण्यावर भर दिला आहे तसेच गवत सुकवण्यासाठी मोकळ्या जागेत ठेवले आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर भातशेतीचे वेळापत्रक बिघडणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२३० मिमी सरासरी पाऊस झाला आहे. दरवर्षी सरासरी पाऊस ३३६४ मिमी पडतो. तुलनेत ८०० मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदा सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात तर सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात झाला आहे.