रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील वर्षी उद्भवलेली पुराची परिस्थिती लक्षात घेता, विविध प्रकारे काळजी घेतली आहे. यावर्षी आधीच सर्व यंत्रणा कार्यान्वित करून त्याची पूर्वतयारी आणि चाचणी देखील घेण्यात आली आहे. शासकीय यंत्रणा मागील वर्षीच्या अनुभवावरून सतर्क झाली असून, आधीच तयारीला लागली आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणींचा देखील सामना करावा लागत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे मार्फत चिपळूण नगरपरिषद हद्दिमध्ये प्रमुख १० ठिकाणी सार्वजनीक उद्घोषणा प्रणाली बसवुन कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र सार्वजनीक उद्घोषणा प्रणाली ही योग्य रित्या कार्यान्वित नसून, त्यामधून प्रसारीत करण्यात येणा-या सुचना व्यवस्थितपणे ऐकु येत नसल्याबाबत काही नागरीकांनी सांगितले आहे.
याबाबत चिपळूण नगरपरिषद प्रशासन व महसूल प्रशासनाकडून सार्वजनीक उद्घोषणा प्रणाली ज्या कंपनीकडून बसविण्यात आली, त्या कंपनीचे समवेत समक्ष पाहणी करुन ती प्रणाली योग्यरित्या कार्यान्वित आहे किंवा त्यामधुन प्रसारीत होणा-या सुचनांचा आवाज चांगल्या पध्दतीने ऐकु येतो की नाही याबाबतची खाजरजमा करण्यात आली असुन ते व्यवस्थितपणे कार्यान्वित आहेत.
सदरची पाहणी करतांना असे निदर्शनास आले की, एका ठिकाणी सदर सार्वजनीक उद्घोषणा प्रणाली यंत्रणेचा आवाज कोणा त्रयस्थ व्यक्तीकडून कमी करण्यात आला होता. याबाबत खबरदारीची उपाययोजना म्हणून चिपळूण नगरपरिषदेने काही कर्मचारी यांची नियुक्ती देखील केली असुन त्यांचे मार्फत वेळोवेळी सदर यंत्रणेची पाहणी करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, नैसर्गिक आपत्तीला तोंड देणार्या जिल्ह्यातील चिपळूण, खेड व अन्य तालुक्यांच्या मदतीला आता शेकडो हात पुढे येणार आहेत. आपदा मित्र व सखी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३०० प्रशिक्षित मित्र प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आपत्तीवेळी धावून येणार आहेत. दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनामार्फत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३०० उमेदवारांची निवड केली जाणार आहे.