कोकण पट्ट्यामध्ये मागील वर्षापासून वन्य जीवांच्या अवयवांची, कातडीची तस्करी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. तळकोकणात विशेष करून या घटना उघडकीस आणण्यात पोलीस यशस्वी ठरत आहेत.
बिबट्याच्या कातडीची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळाल्यानुसार त्यांनी सापळा रचून तळेरे येथून दोघांना अटक केली. संशयिताकडून साडेतीन लाख रुपयांचे बिबट्याचे कातडे व आठ लाख रुपयांच्या दोन कार असा एकूण ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग यांना तळेरे येथे बिबट्याच्या कातड्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याची खातरजमा करून कारवाईचे आदेश सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप भोसले यांना देण्यात आले. त्यानुसार तळेरे येथे सापळा रचला. दोघा संशयितांकडील वाहनांची तपासणी केली. एका वाहनामध्ये बिबट्याचे कातडे आढळले.
याप्रकरणी देवगड येथील श्रावण लक्ष्मण माणगावकर वय २७, रा. तळेबजार आणि राजेंद्र पंढरीनाथ पारकर ६०, रा. वळिवंडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अपर अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस अधिकारी संदीप भोसले, सहायक निरीक्षक महेंद्र घाग, उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार ए. ए. गंगावणे, पी. एस. कदम, हवालदार के. ए. केसरकर, एस. एस . खाडये, आर. एम. इंगळे यांच्या पथकांने केली.