उद्योगमंत्री ना, उद्य सामंत यांना उद्योगमंत्री हे पद मिळाल्यापासून विशेष करून रत्नागिरीकरांच्या त्यांच्या कडील अपेक्षा वाढल्या आहेत. रत्नागिरी संपूर्ण जिल्हा विविध उद्योगधंद्यांसाठी पूरक असून इथे अद्ययावत यंत्रणेसह नवनवीन उद्योग स्थापन करणे गरजेचे आहे. जेणेकरून, चांगले उत्पन्न देणारे उद्योग इथेच स्थापन झाले तर स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना देखील त्यामुळे रोजगार प्राप्त होईल. या संदर्भात खडपोलीचे युवा कार्यकर्ते तुषार शिंदे यांनी चिपळूण तालुक्यात प्रदूषणविरहित उद्योग येण्यासाठी व फूड प्रोसेसिंग युनिट्स, अभियांत्रिकी उद्योग, इतर लघुउद्योग व तत्सम गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी केली आहे.
खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहतींसाठी ३५ वर्षांपूर्वी महामंडळाने स्थानिक शेतकऱ्याच्या जमिनी अधिग्रहण केल्या आहेत, मात्र बोटावर मोजण्याइतके उद्योग वगळता या औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यात आली नाही. खडपोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ८० टक्के भूखंड रिकामे काहीच वापराविना पडून आहेत. अनेक भूखंड उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने खरेदी केले गेले परंतु, त्यावर अद्याप कोणतेही उद्योग सुरू केलेले नाहीत.
खेर्डी-खडपोली औद्योगिक वसाहतींना पुन्हा कार्यशील बनवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घ्यावा, अशी मागणी खडपोलीतील सामाजिक कार्यकर्ते तुषार शिंदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे कि, औद्योगिक वसाहतींना अवजलाच्या रूपाने मुबलक पाणी उपलब्ध आहे. कुशल मनुष्यबळाचीही कमतरता इथे भासणार नाही. होऊ घातलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रकल्पामुळे निर्यातदारांना मुंबई बंदरावर जलद माल पोहोचवणेही सोपे होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता काळ्या भूखंडांवर नवीन उद्योग सुरू केल्यास स्थानिक शेतकऱ्यांनी अल्प मोबदल्यात शासनाला दिलेल्या जमिनींचा देखील विनियोग रोजगार निर्मितीसाठी होईल व स्थानिक युवकांच्या हाताला रोजगार मिळेल.