रत्नागिरी तालुक्यात निकृष्ठ दर्जाचा पोषण आहार वाटप करण्यात आल्या बाबत अनेक घडामोडी घडल्या. पोषण आहाराचे स्थानिक ठेकेदार बदलल्यामुळे शहरात विविध ठिकाणच्या शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वीसारखा मिळणारा दर्जेदार, सकस आहार नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पोषण आहार खाण्याऐवजी घरून डबा नेण्यास सुरुवात केली आहे. अशातच पटवर्धन हायस्कूलमधील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे पालक पोषण आहाराच्या ठेकेदारा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या संबंधीची माहिती पालक शिक्षक प्रतिनिधी संघटना उपाध्यक्ष प्रदीप सर्वे, सौ. भावना पाटील, विनय मुकादम यांनी दिली.
पालकांनी सांगितले की, पटवर्धन हायस्कूलमध्ये पाचवी ते आठवीच्या सर्व वर्गांना दर दिवशी नियमित चांगल्या दर्जाचा पोषण आहार दिला जायचा. हा पोषण आहार पूर्वी स्थानिक बचतगटा मार्फत शाळेमध्येच शिजवून मुलांना दिला जायचा. आता केंद्र सरकार पुरस्कृतचे टेंडर संस्कृती बचत गटाने सौ. पाटील सांगली, तासगाव यांनी ठेका घेऊन चालवण्यास सुरवात केली आहे. या बचत गटाच्या पोषण आहारासंदर्भात विद्यार्थी व पालकांच्या अगदी पहिल्या दिवसापासून अधिक प्रमाणात तक्रारी यायला सुरुवात झाली होत्या. यामध्ये पोषण आहार पाऊण तास उशिरा येणे, तो पुरेसा नसणे, भात कच्चा असणे, अति शिजणे, अळी सापडणे, डाळ, वरण, आमटी अगदी पाणी पातळ व बेचव असणे अशा तक्रारी वारंवार होत होत्या.
सौ. पाटील यांनी पटवर्धन हायस्कूलच्या पालक प्रतिनिधी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अशी ग्वाही दिली आहे कि, पोषण आहारातील त्रुटी येत्या पंधरा दिवसांत दूर करून चांगला पोषण आहार देऊ. याविरोधात बऱ्याच पालकांनी सौ. पाटील यांच्याशी व्यक्तिगत संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी पटवर्धन हायस्कूल येथे भेट देऊन पालक प्रतिनिधी संघटना यांची दिलगिरी व्यक्त केली. चर्चा करून पुढे अशी चूक आमच्याकडून होणार नाही, याची दक्षता घेऊ व येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये पोषण आहार सुधारला जाईल, असे लेखी आश्वासन दिले आहे. यात सुधारणा न झाल्यास पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी, पालक उपोषणाला बसण्याचा इशारा पालक संघटनेने दिला आहे.