मागील वर्षीपासून अचानक सुरु झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व जग ठप्प झाले आहे. कित्येक जण बेरोजगार झाले, काहींच्या नोकर्या गेल्या, काहींचे उद्योग धंदे व्यवसाय बदन झाले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद झाले. शासकीय आस्थापने सुरु ठेवण्यात आली असून, खाजगी नोकरदारांचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. काहीना अशी कामाची पद्धती आवडली तर काहीना नकोशी वाटली.
मोठ्यांबरोबर लहानांची शिक्षण पद्धतीही ऑनलाईन झाल्याने जो तो स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅब समोर घेऊन बसेलेले. इंटरनेट साठी वाय-फाय राऊटर आसपास. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा बर्याच प्रमाणामध्ये खाजगी ऑफीस वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु आहेत. तसेच विद्यार्थीसुद्धा ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षण घेत आहेत. यामध्ये काही प्रमाणात शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचीही तारांबळ उडत आहे.
कोरोनामुळे कराव्या लागणाऱ्या वर्क फ्रॉम होममुळे डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण टीव्ही आणि मोबाईलचा वापर अति प्रमाणात करत असल्याने, डोळ्यांची नजर मंदावणे, डोळ्यांना खाज येणे, डोळे लालसर होणे, डोळ्याच्या पडद्याचा त्रास जाणवणे, धूसर दिसायला लागणे, चष्म्याचा नंबर वाढणे, डोके दुखणे असे एक न अनेक आजार उद्भवू लागले आहेत.
रत्नागिरी मधील अद्ययावत डोळ्यांवर उपचार करणारी हॉस्पीटल्स त्यामुळे कोरोना काळामध्येही सुरु ठेवण्यात आली आहेत. डोळ्यांचे अनेक प्रकारचे उपचार करून घेण्यासाठी अशा अद्ययावत हॉस्पिटलमध्ये रीघ लागलेली दिसते. लहान मुलेसुद्धा कोरोनामुळे गार्डन, प्ले ग्राउंड सर्व बंद असल्याने आणि विरंगुळ्याचे इतर काहीही साधन सध्या उपलब्ध नसल्याने पालकांच्या मोबाइलचा वापर करून गेम खेळणे, यु-ट्युब वर गाणी, डान्स पाहणे यामध्ये जास्तीत जास्त वेळ व्यतीत करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या नाजूक डोळ्यांवर मोबाईलच्या प्रखर किरणांचा दुष्परिणाम दिसून येऊ लागला आहे. रात्रंदिवस केलेल्या मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे अनेक नजरेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.