कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे प्रत्येक जण जेरीस आला आहे. वाढणारे संक्रमण, कोरोनामुळे होणारे मृत्यू अशा अनेक घटना दररोज कानावर येत आहेत. त्यामध्ये अनेक बाबतीत माणुसकीचे दर्शनही झाले तर काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना सुद्धा पहायला मिळाल्या. कोरोनाच्या या व्हायरसची एवढी दहशत मनामध्ये बसली आहे कि, एखाद्याला मदत करण्यासाठी पुढे जाव कि नाही अशी मनाची द्विधा मनस्थिती होते. त्यामध्ये शासनाने येणाऱ्या तिसऱ्या लाटेबद्दल शक्यता वर्तवली असून, जिल्हा यंत्रणेला सतर्क राहायला सांगितले आहे.
रत्नागिरीमध्ये कोरोनाची स्थिती एवढी भयावह बनलेली आहे, त्यामध्ये आरोग्य यंत्रणेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे येण्याचे संकेत दिले आहेत आणि त्यामध्ये लहान मुलांवर या लाटेचा प्रभाव जास्त होणार असल्याचे सुद्धा संकेत दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासानाला या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वनियोजन करायला सांगितले आहे. त्यामुळे रत्नागिरी प्रशासनाने महिला रुग्णालयाच्या दुसर्या इमारतीमध्ये स्वतंत्र्य बाल रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. ज्यामध्ये लहान मुलांसाठी १२ ऑक्सिजन बेडसची विशेष व्यवस्था असलेला कक्ष निर्माण केला गेला आहे. लहान मुलांवर कोणतेच दडपण न येता,आपण घरूनच उपचार घेत आहोत असे वाटण्यासाठी त्या कक्षाचे सुशोभीकरण करून, खेळण्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या संकल्पनेतून हे कोविड बाधित लहान रुग्णांसाठी बाल रुग्णालय विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. लहान मुलांना कार्टून, पक्षी, प्राणी, मोबाईल गेम्स यांचे फार आकर्षण असते. लहान मुलांना एकटेपणा जाणवू नये म्हणून हा कक्ष विविध प्राणी, पक्षी , कार्टून थीमने सुशोभित करण्यात आला आहे. डॉ. फुले यांनी अशा प्रकारचा स्पेशल कक्ष निर्माण करण्याची संकल्पना हेल्पिंग हँड संस्थेचे सदस्य सचिन शिंदे यांना सांगितली. शिंदे यांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने निव्वळ ५ दिवसामध्ये त्या स्पेशल कक्षाचे रुपडे पालटले. लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.