लोटे औद्योगिक वसाहतीतील इंडी ड्यूट मेटॉलो केमिकलसह मिशाल झिंक इंडस्ट्रीज कंपनीतील ३ कोटी रुपयांचे मशिनरी व इतर लोखंडी साहित्य चोरीप्रकरणी ७ जणांसह स्थानिक पुढाऱ्यांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील स्थानिक पुढारी पसार असल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, हि घटना ३० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१९ या कालावधीत घडली आहे. या घटनेबाबत लोटे येथील ए. बी. माऊरी कंपनीचे वैभव विलास आंब्रे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या दोन कंपन्यांच्या इमारतीची तोडफोड करून मोठे लोखंडी चॅनेल, लोखंडी ट्रॅक, रिअॅक्टर, बॉयलर, लोखंडी चिमण्या, कंपनीच्या मशिनरी, लोखंडी शेड, लोखंडी भट्टी, लोखंडी ब्लोअर लाईन्स व इतर कंपनीचे जुने साहित्य असा ३ कोटी रुपयांचा ऐवज ट्रकमधून लंपास केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
मात्र, यानंतर वैभव आंब्रे यांनी येथील पोलिस ठाण्यात पुरवणी तक्रार दाखल करत दोन कंपन्यांमधून चोरीला गेलेल्या भंगार साहित्याचा आकडा ३० कोटी असे मूल्यांकन करण्याची मागणी देखील केली आहे. यानंतर घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामाही केला. या भंगार साहित्य चोरीप्रकरणात कोणत्यातरी स्थानिक पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यानुसार भंगार साहित्य चोरीप्रकरणी ८ जणांसह स्थानिक पुढाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्थानिक पुढाऱ्यांची नावे अजून पुढे आली नसून, हे पुढारी तेथून पसार असल्याचे बोलले जात आहे.