खेड तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी काम करून देण्यासाठी एका पक्षकाराकडून ६ लाख ५० हजार रूपये उकळले. याप्रकरणी संबंधित . पक्षकाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवानंद टोपे आणि सायली धोत्रे अशी त्या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचघर वेताळवाडी येथील एक पक्षकार जमिनीच्या काम साठी येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयात जुलै २०२१ मध्ये गेला होता.
आपले काम पूर्ण करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील संशयित आरोपींनी जुलै २०२१ ते जानेवारी २०२३ या कालावधीत आपल्याकडे ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी त्यांच्याकडे केली. रक्कम न दिल्यास तुमच्या जमिनीच्या कामावर परिणाम होईल व काम होणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.काम होण्यासाठी या दोन कर्मचाऱ्यांनी खेड उपअधीक्षक कार्यालय, फिर्यादीच्या वेताळवाडी येथे घरी, कधी स्वत: तर कधी त्यांच्या हस्तकाद्वारे रोख तसेच ऑनलाइन स्वरूपात ६,५०,००० रूपये स्वीकारले होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित पक्षकाराच्या तक्रारीनुसार येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात या दोघांविरुद्ध ३८४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.