रत्नागिरीतील संगमेश्वरमध्ये सापडलेल्या डेल्टा प्लस रुग्णाबद्दल उलट सुलट चर्चा सुरु असताना संगमेश्वर तालुक्यातील आणखी दोन गावे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्यातील एकूण ५ गावे कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर केल्याने तेथील नागरिक आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे हे नक्कीच दिलासा देणारी बातमी आहे, परंतु, परदेशातून आलेल्या काही व्यक्तींमुळे नवीन व्हेरीअंट पसरण्याच्या भीतीमुळे कंटेंटमेंट झोन जाहीर केल्याने सामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे आणि व्यापार्याचेही न भरून निघणारे नुकसान होत आहे, त्यामुळे संगमेश्वर मधील कंटेंटमेंट झोन त्वरित उठवावा अशी व्यापाऱ्यांची मागणी जोर धरत आहे.
याबाबत सविस्तर माहिती व्यापारी पठान यांनी दिली आहे. शासनाने कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या गावांमध्ये कसबा, नावडी,धामणी, कोंडगाव आणि माभळे चा समावेश आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पत्रकानुसार कसबा १३, नावडी ४, धामणी ३ आणि माभळे १ एवढीच रुग्णसंख्या पॉझिटीव्ह असल्याने, हि संख्या कंटेंटमेंट झोनच्या निकषामध्ये बसते का? असा सवाल व्यापार्यांमार्फत विचारला जात आहे. तसेच जे ३०-३५ प्रवासी परदेशातून गावामध्ये आले आहेत, त्यांची विलागीकरण व्यवस्था, त्यांच्यावर वॉच ठेवणे या गोष्टी वेळीच करणे गरजेचे होते. त्या प्रवाशांची नावे आणि माहिती आंतरराष्ट्रीय विमानतळाहून मिळणे सहज शक्य होते. त्या ३०-३५ जणांसाठी अख्ख्या तालुक्याला वेठीस धरणे योग्य नाही. आणि कोणतीही पूर्वसूचना न देता, कंटेंटमेंट झोन जाहीर केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे असे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्ह्टले आहे.