रत्नागिरीमध्ये मे अखेरीसच पावसाची दमदार सुरुवात झाली होती. अगदी चार दिवस अतिवृष्टी सुद्धा झाली होती. सध्या शेतीचा हंगाम सुरु असल्याने इतरांना नकोसा वाटणारा पाऊस मात्र शेतकऱ्यांसाठी सुखदायक ठरतो. पावसाची निश्चिती झाल्यावर, शेतकर्यांनी गेल्या काही दिवसापासून भात लावणीच्या कामाला प्रारंभ केला आहे. त्यामुळे शेतीच्या कामामध्ये शेतकरी गढून गेला आहे.
राज्यात मान्सून मे अखेरीस दाखल झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आणि गावांना या पावसाने चांगलेच झोडपले तर, मुंबईची तुम्बई झाली. एवढ्या जास्त प्रमाणात पाऊस झाला असताना, आता मात्र गेले दोन दिवस पाऊस नाहीसाच झाला आहे. पुणे वेधशाळेने पुढील आठवडाभर तरी हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. वेळेमध्ये पाऊस दाखल होऊन देखील आत्ता पावसाची गती मंदावलेली दिसून येत आहे.
पावसाची चिन्हे गायब होऊन काही प्रमाणात घामाच्या धारा वाहायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीमध्ये काही भागांमध्ये थेंबभर सुद्धा पाऊस न पडता, कडकडीत उन्ह पडले असल्याने शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे. आधीच कोरोनाच्या संकटामुळे बियाण्यापासून ते अवजारांपर्यंत झालेल्या महागाईने होरपळून सुद्धा शेतीची एक प्रकारची रिस्क घेतलेली आहे. पावसाने दडी मारल्याने पंपाच्या सहाय्याने लावणीच्या कामांना लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. काही ठिकाणी शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने बांधावर पेट्रोल, डीझेल वर चालणाऱ्या पंप पण परवडेनासा झाला आहे. आणि चिखलणी करायला पाणी आवश्यक असतेच, पावसाच्या भरवशावर लावणी करण्यासाठी भातांची रोपे काढून ठेवण्यात आली असून, जर पावसाची स्थिती अशीच राहिली तर कशी लागवड करायची ! असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.