कोकण रेल्वे प्रवासात चोरट्याने प्रवासी महिलेच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली लेडीज पर्स लांबवली. पर्समध्ये रोख रक्कम व दागिन्यांसह ३ लाख १७ हजारांचा ऐवज होता. तसेच महत्वाची कागदपत्रे होती. मंगलोर एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावरून ट्रेन सुटताच काही क्षणातच हा चोरीचा प्रकार घडला. सौ.उज्वला सुनील गावडे (४९) या प्रवाशी गुरुवारी ७ जुलै रोजी मैगलोर एक्स्प्रेसने (मैगलोर सीएसटी १२१३४) मुंबईकडे जाण्यासाठी कणकवली रेल्वेस्थानकावर आल्या. बोगी नंबर एस ४ मधील ३२ नंबरवरील अप्पर बर्थ सिट होती. मैगलोर एक्सप्रेस १.४५ च्या दरम्यान कणकवलीहून सुटली. आणि ४.३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकावर पोहोचली. उज्वला गावडे अप्पर बर्थ वर झोपल्या होत्या. काही लाईटस बंद होत्या.
रत्नागिरी स्थानकावरून ट्रेन सुटताच काही क्षणातच चोरट्याने तिच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली लेडीज पर्स लांबवली. पर्समध्ये आतील बाजूस साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र, १८ हजार रुपये रोख, सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, असा ३ लाख १७ हजारांचा ऐवज चोरांनी पळविला. त्यांच्या सीटच्या आजूबाजूला एक महिला व तीन पुरुष हिंदी भाषिक असल्याचे उज्वला गावडे यांनी ठाणे पोलिसांना सांगितले. उज्वला गावडे यांच्या तक्रारीवरून ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अंमलदार पंढरी कांदे यांनी भादवि कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

