HomeRatnagiriचाफे महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंत्यावर हल्ल्याचा प्रयत्न; धक्काबुक्कीने खळबळ

चाफे महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंत्यावर हल्ल्याचा प्रयत्न; धक्काबुक्कीने खळबळ

विद्युत कनेक्शनच्या वादातून घडला प्रकार; राजेंद्र पवार यांच्यावर उपचार सुरू, जयगड पोलिसांकडून कारवाई

रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील महावितरणच्या कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या एका सहाय्यक अभियंत्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी सुमारे ३.१५ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे कार्यालयीन कामकाजात व्यत्यय येण्यासोबतच परिसरात आणि महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सहाय्यक अभियंता राजेंद्र पवार हे आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त असताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांना धक्काबुक्कीही झाली. या घटनेत प्रसाद गजानन देसाई (रा. मांजरे) यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्काबुक्की आणि तणावाच्या या घटनेनंतर राजेंद्र पवार यांना तातडीने पुढील उपचारासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

वाद कशामुळे झाला? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्युत कनेक्शन देण्याच्या मुद्द्यावरून राजेंद्र पवार आणि प्रसाद देसाई यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद व वाद सुरू होते. याच जुन्या वादाचे रूपांतर शुक्रवारी दुपारी अचानक हल्ल्याच्या प्रयत्नात आणि धक्काबुक्कीत झाल्याचे सांगितले जात आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी, पोलिसांची कारवाई सुरू सरकारी कार्यालयात आणि कर्तव्यावर असताना अशा प्रकारे अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न होणे, ही गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेमुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, संबंधित संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेचे नेमके कारण आणि सविस्तर तपशील पोलीस तपासातून पुढे येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular