कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा, सुपीक जमीन, कृषी, फलोत्पादन पूरक वातावरण, त्यामुळे निसर्गाची एक देणगी लाभलेली आहे म्हणायला हरकत नाही. जे काही पेराल, तिथे सोन्याच्या रुपात उत्पन्न येईल अशी सुपीकता, समुद्रकिनारा, खाडी, नदी-नाल्यांची समृद्धता त्यामुळे इथे चालणारा मत्स्य व्यवसाय सुद्धा तेजीने चालतो. अनेक पर्यटक खास माश्यांची विविधता अनुभवण्यासाठी कोकणामध्ये येतात.
रत्नागिरीचे शुभचिंतक आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व असलेले माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिधुदुर्ग हे जिल्हे देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे वक्तव्य केले आहे. जिल्ह्यातील काजू, आंबा, मासेमारी आणि पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष योजना बनविण्यात आल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. रत्नागिरीच्या विकासासाठी ते कायमच प्रयत्नशील असतात.
सुरेश प्रभू यांनी सदर स्थानिक उत्पन्न निर्माण होणारे उद्योगधंद्यांची निर्यात क्षमता वाढविण्यासाठी आणि पर्यटन विकासासाठी ऑनलाईन चर्चा केली, त्यामध्ये जिल्ह्याचे आणि राज्याचे अनेक वरिष्ठ अधिकारी, या योजेनेशी संबंधित अनेक स्वयंसेवी संस्था देखील सहभागी होत्या. या दोन जिल्ह्यांमध्ये विशेष उत्पन्न घेता येणारे आंबा, काजू अनेक विविध प्रकारची फळे, त्यावर प्रक्रिया करून निर्माण होणारे विविध पदार्थ, त्यांची देशासह परदेशामधून देखील निर्यात व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.
आयआयएम लखनौ आणि नॅशनल कौन्सिल ऑफ एम्प्लाइड ईकॉनॉमिक रिसर्च यांच्यामार्फत हि योजना तयार करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सोबत अनेक अन्य राज्यातील जिल्ह्यांचा देखील या योजनेमध्ये सहभाग आहे. भारताला ५ ट्रीलीयन अर्थव्यवस्था बनविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अभियाना अंतर्गत हि योजना तयार करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या सरासरी उत्पन्नात वाढ झाल्याने आपसूकच जीडीपी मध्येही वाढ होईल.