कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी चिपळूणमध्ये स्टुडिओ सुरू करण्याचा मानस २०१३ मध्ये झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केला होता. त्यांच्या निधनामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहणार आहे. साहित्य संमेलनानिमित्ताने राज्यभरातून येणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी देसाई यांनी ‘कोकणचे खेडे’ साकारले होते. येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरात खास कोकणातले खेडे उभारण्याची जबाबदारी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपवण्यात आली होती. या निमित्ताने त्यांनी ३५० हून अधिक वर्षांपूर्वीचे कोकणातील खेडे उभारले होते तसेच कोकणातील बदलत्या खेड्यांची मांडणीही त्यांनी केली होती.
गावच्या मध्यमागी शंकर मंदिर व सभोवती वसलेले गाव आणि बारा बलुतेदारी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. कोकणातील नदीच्या खोऱ्यात राहणारा धनगर, कातकरी समाज, गवतारू झोपडीतून कोकणवासीयांचा झालेला अधिवास आता विकसनशीलतेच्या टप्प्यावर कसा आला आहे. याची मांडणी त्यांनी केली होती. या संमेलनस्थळी त्यांनी जुने हत्ती, दीपमाळा, चौथरे आदी साहित्य उभे केले होते. संमेलनाच्या निमित्ताने देसाई काही दिवस चिपळूणात मुक्कामी होते. संमेलनात ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ या परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला होता. आपण चिपळूणच्या प्रेमात पडल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.
साहित्य व सिनेमा यांचे नाते तोडता येण्यासारखे नाही. हे मान्य करूनही चित्रपटांसाठी कालानुरूप व तांत्रिकदृष्ट्या सकस लेखन साहित्यिकांकडून येत नाही. त्यामुळे लेखकांनी स्वतःला योग्य साच्यात बसवलं पाहिजे. साहित्याची जोड मिळाल्याशिवाय चित्रपट निर्माण होणारच नाही. मी स्वतः ऐतिहासिक पुस्तकांवर आधारित चित्रपट काढले आहेत, असे मत त्यांनी मांडले होते. संमेलनाच्या निमित्ताने देसाई काही दिवस चिपळूण मुक्कामी होते. त्यांना इथल्या निसर्गाची भुरळ पडली होती. मी चिपळूणमध्ये स्टुडिओ उभा करणार, असे आश्वासन त्यांनी त्या वेळी दिले होते. त्यानंतर त्यांनी काही जागांची पाहणीही केली होती. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चिपळूणला स्टुडिओ उभारण्याचे अपुरे राहिले.